टोमॅटोचे दर स्वस्त होण्यामागचं ‘हे’ आहे कारण; कांदा, लसणाचे भाव दहा टक्क्यांनी वधारले | पुढारी

टोमॅटोचे दर स्वस्त होण्यामागचं 'हे' आहे कारण; कांदा, लसणाचे भाव दहा टक्क्यांनी वधारले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : टोमॅटोच्या नवीन लागवडीचे उत्पादन सुरू झाल्याने पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात टोमॅटोची आवक वाढू लागली आहे. रविवारी (दि. 13) बाजारात पुणे विभागातून तब्बल नऊ हजार क्रेटची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत आवक दुपटीने वाढली. परिणामी, घाऊक बाजारात टोमॅटोच्या दहा किलोचे दर तीनशे ते पाचशे रुपयांवर पोहचले, तर किरकोळ बाजारात गत आठवड्याच्या तुलनेत किलोमागे 20 रुपयांची घसरण होऊन भाव 120 ते 140 रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

पावसाने उघडीप दिल्यानंतर बाजारात फळभाज्यांची वाढलेली आवक कायम आहे. रविवारी बाजारात शंभर ट्रकमधून फळभाज्यांची आवक झाली. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने कांदा व लसणाच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.

परराज्यांतील गुजरात व कर्नाटक येथून 10 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथून 4 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून 4 टेम्पो शेवगा, इंदूर येथून गाजर 9 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 4 टेम्पो, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग, कर्नाटक येथून पावटा 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 टेम्पो आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 800 गोणी, गवार 5 टेम्पो, भेंडी 7 टेम्पो, हिरवी मिरची 2 टेम्पो, फ्लॉवर 10 टेम्पो, कोबी 4 टेम्पो, टोमॅटो सुमारे नऊ हजार क्रेट, ढोबळी मिरची 10 टेम्पो, भुईमूग शेंग 100 गोणी, मटार 5 टेम्पो, तांबडा भोपळा 10 टेम्पो, कांदा 70 ट्रक, इंदूर व आग्रा भागातून बटाटा 40 ट्रकमधून बाजारात दाखल झाला.

पालेभाज्यांतील स्वस्ताई टिकून

पाऊस सुरू झाल्यानंतर जिल्ह्याच्या विविध भागांत पालेभाज्यांच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी, बाजारात पालेभाज्यांची वाढलेली आवक कायम आहे. रविवारी बाजारात कोथिंबिरीची दीड लाख तर मेथीची सत्तर हजार जुडींची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक स्थिर राहिली, तर मेथीची आवक तीस हजार जुड्यांनी घटली. बाजारातील आवक- जावक कायम राहिल्याने पालेभाज्यांचे गत आठवड्यातील दर टिकून होते.

हेही वाचा

शिर्डी : सुट्ट्यांमुळे साईनगरीत भाविकांचा महापूर

साखर, डाळी, कडधान्ये, बेसन दरात वाढ; गावरान ज्वारी दरात घट

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका करणार दिव्यांगांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण

Back to top button