पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर पुन्हा वाहतूक कोंडी; वाहनचालक मेटाकुटीला | पुढारी

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर पुन्हा वाहतूक कोंडी; वाहनचालक मेटाकुटीला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सलग आलेल्या सुट्यांमुळे रविवारी (दि. 13) पुन्हा पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे वाहतूक कोंडीत अडकला होता. खासकरून पिकअवरमध्ये येथे कोंडी झाली होती. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांच्या नाकीनऊ आले. कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागली. गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेला (यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग) कोंडीचे ग्रहण लागले आहे. जलदगतीने आणि कमी वेळात पुणे-मुंबई प्रवास व्हावा, यासाठी या मार्गाची निर्मिती केली होती.
मात्र, हा रस्ता आता वाहनांसाठी अपुरा पडत असून, या रस्त्यावरून गेल्यामुळे जलद गतीने पोहचण्याऐवजी प्रवाशांना तासन् तास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. मागील दोन आठवड्यांपूर्वी या मार्गावर कामशेत बोगदा आणि खंडाळा परिसरात कोसळणार्‍या दरडींमुळे कोंडी झाली होती. या वेळी महामार्ग पोलिसांना सलग तीन दिवस हा मार्ग प्रत्येकी 2 तास बंद ठेवावा लागला होता. आता मात्र सलग सुट्या आणि भुसावळ विभागातील कामामुळे रेल्वेच्या रद्द झालेल्या अनेक गाड्यांमुळे महामार्गावर प्रचंड कोंडी होत आहे.

कोंडी सोडविण्यासाठी घेतले दोन ब्लॉक

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर शनिवारी (दि. 12)  प्रचंड कोंडी झाली होती. ती सोडविण्यासाठी आम्हाला दिवसभरात 6 ब्लॉक घ्यावे लागले. मात्र, शनिवारपेक्षा रविवारी कोंडीचे प्रमाण कमी होते. सकाळी  10 ते 12 या वेळेत दोन ब्लॉक घेऊन झालेली कोंडी सोडविण्यात आली. सायंकाळीसुध्दा कोंडी वाढल्यास आमच्याकडून ब्लॉकचे नियोजन आहे, असे बोरघाट केंद्राचे (महामार्ग पोलिस) सहायक पोलिस निरीक्षक योगेश भोसले यांनी दै. ’पुढारी’शी बोलताना सांगितले.
सलग सुट्या असल्यामुळे अमृतांजन पुलाजवळील खंडाळा एक्झिट (किलोमीटर 42 ते 45) दरम्यान तीन किलोमीटरच्या मार्गावर कोंडी होत आहे. या ठिकाणी झालेली कोंडी सोडविण्यासाठी आमच्याकडून ब्लॉक घेऊन नियोजन करण्यात येत आहे.
– लता फड, 
पोलिस अधीक्षक, महामार्ग
हेही वाचा

Back to top button