एल-निनोमुळे मान्सूनला ब्रेक; बरसणार 20 ऑगस्टनंतर | पुढारी

एल-निनोमुळे मान्सूनला ब्रेक; बरसणार 20 ऑगस्टनंतर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशात गेल्या 6 दिवसांत सरासरीपेक्षा 50 टक्के कमी पाऊस झाला. जुलैमध्ये सरासरीपेक्षा 7 टक्के पाऊस जास्त झाला होता. प्रशांत महासागरातील एल-निनो/ ला-निना ही चक्रीवादळे, हिंद महासागरातील आयओडी (इंडियन ओशन डायपोल) तसेच एमजेओ (मेडन ज्युलियन ओसिलेशन) या 3 हवामानविषयक परिस्थितींचा परिणाम म्हणून हे चित्र सध्या आहे. आता 20 ऑगस्टनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विशेषत: 31 जुलैनंतर एल-निनोची तीव्रता अधिक जाणवली. ही तीव्रता त्याच्या परतीपर्यंत अशीच राहणार आहे. पावसात 6 ऑगस्टपासून पडलेला खंड आणखी काही दिवस राहील, असा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी वर्तविला आहे.
मान्सूनमध्ये प्रशांत महासागरातून येणारे वारे पावसासाठी अनुकूल ठरतात. हे वारे आठवडाभरापासून बंद आहेत. प्रशांत महासागरात तयार झालेली 4 वादळे त्यामागे आहेत. या वादळांनी मान्सूनच्या ढगांतून आर्द्रता शोषून घेतली. सध्या मान्सूनची अक्षरेषा हिमालयाजवळ असल्याने हिमाचल, उत्तराखंडसह उत्तर पंजाबात पाऊस होत आहे. बिहार व आसामच्या नेपाळ सीमेलगत असलेल्या भागांमध्ये पूरस्थिती उद्भवणे शक्य आहे. उर्वरित देशात मात्र पाऊस एक तर नाही किंवा यथातथाच आहे.

आशा कायम…

एमजेओ साधारणपणे 1 ते 2 महिन्यांत पृथ्वीची एक परिक्रमा पूर्ण करते. परिणामी 30 सप्टेंबरपूर्वी एमजेओमुळे मुसळधार पाऊस बरसणे शक्य आहे.

एल-निनो, आयओडी, एमजेओ

1) एल-निनो : जूनपासून मान्सूनवर परिणाम
2) आयओडी : सक्रिय झाल्यानंतर देशाच्या दक्षिण, पश्चिम भागात जास्त पाऊस होतो. सध्या संथ आहे.
3) एमजेओ : ढगांचा मोठा समूह पश्चिमेकडून पूर्वेकडे येतो.

Back to top button