ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्णांचा मृत्यू | पुढारी

ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्णांचा मृत्यू

ठाणे : पुढारी वृत्तसेवा उपचाराअभावी ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला असताना आता एका रात्रीत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे.

प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉकटर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे एकाच रात्रीत या १८ जणांना जीव गमवावा लागला असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. तर यातील १३ रुग्ण हे आयसीयू मधील तर४ रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते, तसेच या रुग्णांना शेवटच्या क्षणी आणले असल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

रुग्णालय प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा देताना काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटल मधून शेवटच्या क्षणी आल्याने, काही रुग्ण ८० पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे, दुसरीकडे सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने डॉकटर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे, १० तारखेला एकाच दिवशी ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते, आता केवळ रात्री १०.३० पासून सकाळी ८.३० पर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचे भूमीपूजन ठाण्यात केले होते, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र हे करत असताना सर्वात जुने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मृतांची नावे

१. गीता (अनोळखी)
२. झायदा शेख (वय ६०)
३. सुनीता इंदुलकर (७०)
४. ताराबाई हरी गगे (५६)
५. भानुमती पाढी (८३)
६. सनदी सबिरा मोहहम्द हुसेन (६६)
७. निनाद रमेश लोकूर (५२)
८. भास्कर भीमराव चाबूस्वार (३३)
९. अमरिन अब्दुल कलाम अन्सारी ( ३३)
१०. अशोक जयस्वाल (५३)
११. भगवान दामू पोतदार (६५)
१२. अब्दुल रहीम खान (५८)
१३. सुनील तुकाराम पाटील (५५)
१४. ललिताबाई शंकर चव्हाण (४२)
१५. चेतक सुनील गोडे (४)
१६. अशोक बाळकृष्ण नीचाल (८१)
१७. नूरजहाँ खान (६०)
१८ कल्पना जयराम हुमाने (६५)

मृत्यू पावलेल्या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. यातील एका रुग्णाने विष प्राशन केले होते, तर एकाला सर्पदंश झाला होता. प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे आहे.

– डॉ. राकेश बारोट, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा

Back to top button