

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खडकीतील पटेल चाळ… वार गुरुवार… वेळ सायंकाळी पाचची… एकाने पोलिसांना कळविले की, एकाने घरात स्फोटके ठेवली असून, त्याला घड्याळ जोडलेले आहे. त्याचा फोटोही पाठविला. वस्तू संशयास्पद वाटल्यामुळे गुन्हे शाखा युनिट-4चे पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी घटनास्थळी धाव घेत बीडीडीएसच्या पथकाला बोलावून खातरजमा केली. त्या वेळी ती स्फोटके किंवा बॉम्ब नसल्याचे समोर आले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
व्यावसायिक स्पर्धेतून खोडसाळपणा करीत दोघांनी एका व्यक्तीला नाहक त्रास देण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मग काय पोलिसांनीदेखील दुसर्या दिवशी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत तळ ठोकून खोडसाळपणा करणार्या दोघांना बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी कल्पेश अशोक आगरवाल (वय 24, रा. खडकी स्टेशनच्या पुढे, पटेल चाळ), गौरव गौतम मोरे (वय 22, रा. बोपोडी) या दोघांविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस कर्मचारी अजय गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कल्पेश आगरवाल हा चहाची टपरी चालवतो, तर ज्याच्या घरात स्फोटके असल्याचे सांगण्यात आले होते, त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. कल्पेशनेच पोलिस कर्मचारी अजय गायकवाड यांना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता एका व्यक्तीच्या घरात स्फोटके असल्याची माहिती दिली. एवढेच नाही, तर त्याचा फोटो पाठविला. पोलिसांना घटना गंभीर वाटल्यामुळे त्यांनी बॉम्बशोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथकाला पाचारण केले. त्यांनी श्वान पथकाच्या मदतीने संशयित वस्तूची पडताळणी केली. तेव्हा ती स्फोटके नसल्याचे समोर आले. ते आईस्क्रीमचे डबे होते. त्यांना वायर जोडण्यात आली होती तसेच एक घड्याळ होते.
आगरवालने पोलिसांना ही माहिती दिली होती. मात्र, त्याच्या बोलण्यात पोलिसांना संशय आला. त्याला हे कोणी कळविले, असे पोलिसांनी विचारले. तर त्याने एका व्यक्तीचे नाव सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला तेव्हा तो उत्तर प्रदेशात असल्याचे दिसले. घडलेली घटना आणि त्याने त्या व्यक्तीची सांगितलेली माहिती यामध्ये तफावत आढळून आली. मग पोलिसांनी आपला खाक्या दाखवून आगरवालला बोलते केले. त्याने आपणच हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले.
पुणे पोलिसांनी गेल्या महिन्यात दोन मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना पकडले आहे. हे दहशतवादी मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस अलर्ट आहेत. त्याचा भाग म्हणून खडकीतील स्फोटके असलेल्या कॉलला पोलिसांनी तत्काळ प्रसंगावधान राखत हाताळले. अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्यासह इतर अधिकारी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत खडकीत तळ ठोकून होते.
हेही वाचा