नगर : अधिकारी नवे, वेबवर कारभारी मात्र जुने | पुढारी

नगर : अधिकारी नवे, वेबवर कारभारी मात्र जुने

नगर : जिल्हा पोलिस दलात अधिकार्‍यांच्या बदल्या होऊन साडेपाच महिन्यांचा काळ उलटला. तरीही पोलिसांची वेबसाईट अपडेट झालेली नाही. पोलिस ठाण्यांचे कारभारी म्हणून जुनेच अधिकारी दिसत आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवायांची अलीकडील कोणतीही माहिती त्यात नाही. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचे नाव व फोटो वगळता सर्व जुन्याच वरिष्ठ अधिकार्‍यांचे नाव व फोटो वेबसाईटवर झळकत आहेत. ‘टेक्नोसॅव्ही’ काळात नगर पोलिस दलाची अनअपडेटेट वेबसाईट चर्चेंचा विषय बनला आहे.

नगर जिल्हा पोलिस दलाची स्वतंत्र वेबसाईट आहे. आधुनिक काळात सायबरचे धोके लक्षात घेता व जनजागृतीसाठी वेबसाईटसारख्या प्रभावी माध्यमांचा वापर करणे अनिवार्य आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी फेब्रुवारी महिन्यांत पोलिस ठाण्याचे कारभारी बदलले. तसेच, गृह विभागाच्या बदल्यांमध्ये पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारीही बदलले आहेत.

मात्र, पोलिस दलाची वेबसाईट अपडेट होण्याबाबत अफलातून गमती झाल्याचे दिसून येत आहे. वेबसाईटवरील माहितीनुसार पोलिस ठाण्यांचे अधिकारी जुनेच असल्याचे ‘पुढारी’च्या पाहणीत समोर आले आहे. बहुतांश पोलिस ठाण्यांतील जुने अधिकारी जाऊन त्या ठिकाणी साडेपाच महिन्यांपूर्वीच नवीन अधिकारी हजर झाले असताना वेबसाईटमध्ये मात्र कोणताही बदल झाला नसल्याचे चित्र आहे.

संकेतस्थळाचे रूपडे भारी; पण…

पोलिसांच्या संकेतस्थळाचे रूपडे भारी; पण अनअपडेटेट असल्याने वेबसाईटला भेट देणार्‍या यूजर्संचा भ्रमनिरास होत आहे. पोलिसांनी गेल्या काही दिवसांत अनेक धडाकेबाज कारवाया केल्या; पण याची माहिती अपडेट नाही. वरिष्ठ पोलिस अधिकारीही जुनेच आहेत.
काही उदाहरणे द्यायची झाली, तर नगर ग्रामीणच्या पोलिस उपअधीक्षकपदी संपत भोसले यांची बदली झालेली असताना पूर्वीचे अजित पाटील यांचेच नाव व फोटो वेबसाईटवर आहे. तसेच, संगमनेरचे डीवायएसपी राहुल मदने यांची बदली होऊन मोठा काळ उलटला, तरीही वेबसाईटला त्याचाच फोटो आहे. शिर्डीचे डीवायएसपी म्हणून संदीप मिटके यांची बदली झालेली आहे, त्याचीही माहिती अपडेट नाही.

वेबसाईट सांभाळणारी यंत्रणा झोपेत

प्रमोशन, नियमित बदल्या, विनंती बदल्या झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही होत असते. पोलिस अधिकारी बदलले तसेच इतर आणखी काही बदल झाल्यानंतर ती माहिती पोलिस दलाच्या वेबसाईटलादेखील करणे गरजेचे आहे. हायटेक जमान्यात अनेक नागरिक वेबसाईटला भेट देऊन त्यानुसार संपर्क करतात. पण नगर पोलिसांची वेबसाईट सांभाळणारी यंत्रणा ‘अलर्ट’ नसल्याने साडेपाच महिन्यांपासून अपडेटचा विसर पडलेला आहे.

एसीपींनी लक्ष घालण्याची गरज

कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून राकेश ओला ओळखले जातात. गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया, अवैध धंदे चालविणार्‍यांची नाकाबंदी, योग्य प्रशासन हाताळून एसपी ओला यांनी आपल्या कामातून चमक दाखविली आहे. मात्र, पोलिसांचा डिजीटल चेहरा असलेली वेबसाईट ‘अनअपडेटेट’ असल्याने पोलिस दलाचे हसू होत आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक संबंधित अधिकारी, कर्मच्यार्‍यांसोबत कसे ‘रिअ‍ॅक्ट’ होतात हे पाहणे, औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा

अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्यावरुन लोकसभेत प्रचंड गदारोळ

लोणी भापकर : अंगणवाडी भरते पत्र्याच्या शेडमध्ये

मंगळाच्या भ्रमणाचा वाढला वेग

Back to top button