नवमातांनी आहार, स्तनपानाकडे द्यावे लक्ष; डॉक्टरांचा सल्ला

नवमातांनी आहार, स्तनपानाकडे द्यावे लक्ष; डॉक्टरांचा सल्ला

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गर्भावस्थेत महिलेचे वजन 8 ते 12 किलोने वाढणे हे नैसर्गिक आहे. परंतु, आजकालच्या नवीन माता वाढत्या वजनाबाबत खूप काळजी करतात. वजन लवकर कमी करण्याच्या घाईचा परिणाम त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे दोघांच्या आरोग्याचा विचार करून मातांनी स्तनपान, आहार याकडे लक्ष द्यायला हवे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती अभियान राबवले जात आहे.

त्यासाठी नवमातांना स्तनपानाचे महत्त्व आणि त्यासाठी आवश्यक असणारा आहार याबाबत डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जात आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. शैलजा माने म्हणाल्या, 'आईने योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे. आईच्या दुधामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. तेवढे अधिक पाणी पिणे व पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते. 'घराबाहेरील जंक फूड, शीतपेये टाळायला हवीत. आई जे खाते, त्यानुसार स्रावाची निर्मिती होते. त्यानुसार प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वांचे प्रमाण असते. त्यामुळे आईने पौष्टिक, घरगुती, सकस अन्नाचे सेवन करणे फायद्याचे ठरते.'

नोकरदार नवमातांनी काय काळजी घ्यावी?

  • कामावर रुजू झाल्यावर दर 2 ते 3 तासांनी स्तन रिकामे करणे गरजेचे असते. त्यामुळे तिथे दूध पाजण्यासाठी आणि काढण्यासाठी जागा असणे गरजेचे आहे. दूध काढले नाही तर स्तनांमध्ये गाठी होऊ शकतात. मातेने पाणी, साबण, सॅनिटायझर, नॅपकिन, दूध काढण्यासाठी कंटेनर अशी सोय असावी. दूध काढून ठेवण्यासाठी कंटेनर अशी सोय केली पाहिजे.
  • सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे.
  • कुटुंबातील सदस्यांनी नोकरदार नवमातेला समजून घेणे, मदत करणे आवश्यक असते.

नवमातांनी दोनदा जेवण आणि दोनदा नाश्ता केला पाहिजे. मधल्या वेळेत फळे, सुका मेवा खायला हवा. हळीव, मेथी किंवा बाजरीसारखे पारंपरिक पदार्थ खाल्ल्याने दूध वाढायला मदत होते. व्यवस्थित आहार न घेतल्यास हाडे ठिसूळ होऊन कंबर दुखणे, पाठदुखी किंवा गुडघे दुखणे यांसारख्या व्याधी सुरू होतात. त्यामुळे पोषक आणि समतोल आहार घेणे गरजेचे आहे.

– डॉ. शैलजा माने, बालरोग विभागप्रमुख, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news