रविकांत तुपकर यांना ‘स्वाभिमानी’चा अल्टिमेटम | पुढारी

रविकांत तुपकर यांना ‘स्वाभिमानी’चा अल्टिमेटम

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते रविकांत तुपकर (बुलडाणा) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह संघटनेच्या कार्यप्रणालीवर आरोप केले आहेत. त्यावर संघटनेच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत शेट्टी यांनी बाजू मांडली असताना या बैठकीकडे तुपकर यांनी पाठ फिरवली. त्या पार्श्वभूमीवर शिस्तपालन समितीच्या पाच सदस्यांसमोर 15 ऑगस्टपर्यंत तुपकर यांना बाजू मांडण्याची संधी देण्याचा निर्णय मंगळवारी (दि. 8) पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. अन्यथा समितीमार्फत वेगळा निर्णय घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक झाली. शिस्तपालन समितीमध्ये संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप,  प्रा. जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, प्रा. प्रकाश पोफळे आणि सतिश काकडे यांचा समावेश आहे.  या समितीसमोर तुपकर यांना बाजू मांडावी लागणार आहे.  बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील व पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
यावेळी प्रा. पाटील म्हणाले, राज्यात गेली 23 वर्षे संघटना शेतकर्‍यांसाठी कार्यरत आहे. संघटनेच्या जोरावर सदाभाऊ खोत आमदार होऊन  कृषी राज्यमंत्री झाले. तर रविकांत तुपकर यांनाही वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले. विदर्भातील आश्वासक युवा चेहरा म्हणून जुन्या-जाणत्यांना बाजूंला ठेवून त्यांना संघटनेने पद दिले. पक्षनेतृत्वाने घेतलेल्या या  निर्णयांचे चळवळीने स्वागत केले. ज्यांना स्वाभिमानीने पदे दिली तेच संघटनेवर वार करीत असून, संघटनेने अनेक धक्के पचविले आहेत. तुपकर यांचे आरोप तथ्यहीन असून, माध्यमांमध्ये चर्चा न करता एका व्यासपीठावर बसून वाद मिटावा म्हणून पत्र देऊनही तुपकर बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. म्हणून आठ दिवसांचा अल्टिमेटम त्यांना देण्यात आला आहे.
संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या बोलण्याचा रोख हा गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर आहे. शेतकरी चळवळीच्यादृष्टीने ते हानिकारक भूमिका मांडत असल्याने मी संघटनेच्या शिस्तपालन समितीसमोर माझी भूमिका मांडली आहे. सर्वच पक्ष व संघटनांमध्ये फूट पडत आहे. शेतकरी नेते शरद जोशी यांनाही त्यातून जावे लागले आहे.
                                                               – राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना. 
हेही वाचा :

Back to top button