पुणे : चेंबरचा धोका; चुके काळजाचा ठोका ! चेंबर्समुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता | पुढारी

पुणे : चेंबरचा धोका; चुके काळजाचा ठोका ! चेंबर्समुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता

प्रसाद जगताप

पुणे : रस्त्याच्या वर डोकावणारे, तर काही ठिकाणी खचलेले चेंबर, ठिकठिकाणी निघालेली खडी, छोटे-मोठे  खड्डे, यामुळे सातारा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. पावसाचे पाणी साचत असल्याने खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अपघातांचे  प्रमाण वाढण्याची भीती आहे. रहदारीचा हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.
 सातत्याने बरसणार्‍या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.  सातारा  रस्त्यावर असे चित्र आहे.   अनेक ठिकाणी  खड्डे पडून रस्त्यांची अक्षरश:  चाळण झाली आहे. हलक्या पावसातच प्रशासनाच्या दर्जाहीन कामाचे पितळ उघडे पडले आहे. तर, अर्धवट आणि नियोजनशून्य कारभारामुळे रस्त्यावर असलेले चेंबर डोके वर काढत आहेत.  काही चेंबर  खचले आहेत.   धोकादायक चेंबर रात्री दिसत नाहीत.  सातारा रस्त्याची दयनीय स्थिती असतानादेखील याकडे  प्रशासन दुर्लक्ष करत आहे.  त्यामुळे सातारा रस्त्यावर दुचाकीस्वारांचे मोठे अपघात होण्याची भीती आहे. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनांचही गती मंदावते. परिणामी पिकअवरमध्ये  वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
पद्मावती चौकात खड्डेच खड्डे
स्वारगेटहून आल्यानंतर कात्रजच्या दिशेने जाणार्‍या लेनवर पद्मावती चौकात मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याची चाळण झाली आहे. या ठिकाणी पाऊस पडल्यावर पाणी साचत असून, रस्त्याची खडी निघालेली आहे. निघालेल्या खडीमुळे आणि येथील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता आहे.
वाहने अडकण्याची भीती
कात्रजच्या दिशेने जात असताना बालाजीनगरच्या चढाला असलेल्या लोखंडी जाळीच्या चेंबरची अवस्था दयनीय आहे. यात  एखादे वाहन अडकून अपघाताची शक्यता आहे.  येथील सिमेंटचा चेंबरसुध्दा खचण्याच्या स्थितीमध्ये आला आहे.
मला कामानिमित्त सातत्याने सातारा रस्त्यावरून ये-जा करावी लागते. पूर्वी सातारा रस्त्यावर खड्डे नव्हते. मात्र, पाऊस सुरू झाल्यापासून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत आणि खडी निघालेली आहे. यामुळे   दुचाकीचे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. 
                                                                                                   – रमेश खरात, वाहनचालक 
हेही वाचा :

Back to top button