मोठी बातमी ! पुण्यातील दहशतवादाचे प्रकरण एटीएसकडून होणार एनआयएकडे वर्ग | पुढारी

मोठी बातमी ! पुण्यातील दहशतवादाचे प्रकरण एटीएसकडून होणार एनआयएकडे वर्ग

महेंद्र कांबळे

पुणे : पुण्यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांचा थेट संबंध इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरीयाशी (इसिस) च्या ‘अलसुफा’ संघटनेशी आला होता. तत्पूर्वी एनआयने पुणे, मुंबई, ठाणे परिरसरातून कारवाई करत काहींना अटक केली होता. त्यांचा देखील संबंध इसिसशी असल्याचे उघड झाले आहे. राजस्थान येथील स्फोटक बाळगल्याचे प्रकरण, पुण्यात पकडलेले दोन दहशतवादी अन इसिसचे राज्यातून अटक केलेले दहशतवादी हे तिन्ही प्रकरणाचा एकमेकांशी संबध आल्याने व गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने हा तपास आता पुणे पोलिसानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) आला असतानाच आता पुन्हा हा तपास एनआयएकडे वर्ग केला जाणार असल्याच्या हालचालींना वेग आला आहे.

त्यामुळे हे प्रकरण कोणत्याही क्षणी एनआयएकडे वर्ग केले जाण्याची शक्यता वाढली आहे. राजस्थान येथील स्फोटके बाळगल्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरीया (इसिस) च्या बंदी असलेल्या अलसुफा या संघटनेशी कनेक्शन असल्याचे कारवाई केल्यानंतर उघड झाले होते. त्यातील दोन दहशतवादी सुरवातीला मुंबई येथे नंतर तेथून पुण्यात आले होते. दोन आठवड्यांपूर्वी दोघांना कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरताना अटक केली होती. त्यामध्ये अटक केलेले महंमद युनूस महंमद याकू साकी आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान यांच्याकडील तपासात त्यांच्याकडे ड्रोनचे साहित्य व तसेच स्फोटकाच्या पांढर्‍या गोळ्या तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले होते.

दरम्यान गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा पुणे पोलिसांकडून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला होता. पंरतु, या दरम्यान त्या तपासावर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) देखील लक्ष ठेवुन होती. तपासादरम्यान एटीएसच्या हाती मोठे धागेधोरे लागले. त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या विश्लेषणावरून त्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूर येथील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी जंगलाची रेकी करण्यासाठी ड्रोन कॅमेर्‍याचा वापर केला होता. तसेच आपली ओळख लपविण्यासाठी त्यांनी हॉटेलचा आधार न घेता त्यांनी जंगलात राहण्यासाठी टेन्टचा वापर केला.

त्यांना या दरम्यान बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देखील मिळाले. एटीएसने एक पाऊल पुढे टाकत त्यांना आसरा देणार्‍या अब्दुल दस्तगीर पठाण याला अटक केली. दरम्यान त्यांना आर्थिक रसद पुरविल्याच्या आरोपावरून समिब काझी या रत्नागिरीच्या युवकाला आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी अटक केली. त्या पुढे एटीएसने यापुर्वी एनआयने इसिसच्या संपर्कात असल्याच्या कारणावरून जुल्फीकार बडोदावाला याला अटक केली होती. त्याचा या गुन्ह्यातही सहभाग असल्याने व त्याने आर्थिक रसद पुरविण्या बरोबरच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडील तपासात एटीएसला महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

त्याच्याकडे देशभरात घातपात घडविण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले नकाशेही सापडल्याने गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. हा गुन्हा केवळ महाराष्ट्रापुरता न राहित्याने व आरोपींचा संबंध देशातील इतर ठिकाणांशी आल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, एनआयएने 3 जुलै 2023 रोजी मुंबई, ठाणे आणि इतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्यानंतर चौघांना अटक केली होती. मुंबईतून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातून जुबेर नूर मोहम्मद ऊर्फ शेख अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली आहे.

तर नुकताच एनआयएने आयसिसच्या महाराष्ट्र गटाचा (मोड्युल) डॉ. अदनान अली सरकार (वय 43) त्यानंतर आता भिवंडीतून आकिफ नाचन याला अटक केली आहे. तरुणांची माथी भडकवून त्यांना आयसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून दहशतवाद्यांचा कट होता. देशाच्या एकात्मतेला, सुरक्षेला, अखंडतेला तसेच सार्वभौमत्वाला धोका पोहचविण्याचा त्यांचा मानस होता. तसेच महाराष्ट्रातील स्लिपर सेल वाढविण्याचेदेखील त्यांचे काम सुरू होते. बडोदावाला हा तरुण शस्त्र बनविण्याचे तसेच इम्प्रोव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडीज) तसेच हातबॉम्ब बनविण्याचे तसेच पिस्तूल बनविण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानेच कोथरूड येथून पकडलेल्या दोघांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले असल्याचेही एनआयएने त्यांच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले होते.

दहशतवाद्यांकडून कार, पिस्तूल, काडतूसे जप्त
एटीएसने शनिवारी रात्री कारवाई करुन दहशतवाद्यांची दुचाकी, मोटार जप्त केली, तसेच पिस्तूल आणि पाच काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांकडून रासायनिक पावडर, द्रव्ये, प्रयोग शाळेतील उपकरणे, पिपेट असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी बाँम्ब तयार करण्याचे साहित्य पुुरून ठेवले होते. एटीएसच्या पथकाने बाँब तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे.

हेही वाचा :

पुणे स्टेशन परिसरातील टोळीवर मोक्का कारवाई

पुणे : स्कूल व्हॅन चिखलात रुतली, पोरं ’धक्का’ देऊन थकली!

Back to top button