धायरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाटा येथील उड्डाणपुलावर एका मद्यपी तरुणाने 'शोले स्टाईल' गोंधळ घातला. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन या तरुणाला ताब्यात घेतले. मद्यधुंद अवस्थेत असलेला हा तरुण उड्डाणपुलाच्या कठड्यावर जाऊन बसला होता आणि चित्र-विचित्र हावभाव करत होता. त्याचा थोडाही तोल गेला असता, तर तो खाली कोसळला असता. दरम्यान, या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिवसेनेचे शहर उपप्रमुख भरत कुंभारकर पाटील यांनी तात्काळ सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांना माहिती दिली.
त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, बिट मार्शल नेताजी कातांगळे व समीर देशमुख, वाहतुक शाखेचे विनोद कांबळे आदी घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर पुलाखालील नागरिकांनी त्याला बोलण्यात नादवून ठेवले. तोपर्यंत पोलिसांनी उड्डाणपुलावर जाऊन त्याला झडप घालून पकडले. त्यानंतर त्याला तात्काळ अभिरुची पोलिस चौकीत नेण्यात आले आणि त्याच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांच्या व नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले. यामुळे वडगाव, धायरी परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.
हेही वाचा