शरद पवार आमचे नेते, दोन-चार महिने… म्हणत वळसे थांबले | पुढारी

शरद पवार आमचे नेते, दोन-चार महिने... म्हणत वळसे थांबले

शिक्रापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील धामरी गावातील कार्यक्रमात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवरील ‘सस्पेन्स’ चांगलाच वाढविला. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सोडलेला नाही. शरद पवार आमचे नेते आहेत. दोन चार महिने…,’ असे म्हणत वळसे पाटील यांनी या विषयालाच बगल देत कांदा अनुदान प्रश्नावर बोलण्यास सुरुवात केली आणि राज्याच्या राजकारणात अजून काही घडणार का? याबाबत सस्पेन्स निर्माण केला.

पत्रकारांनी नंतर त्यांच्याकडे या विषयावर विचारणा केली असता, त्यांनी हसत विषय टाळला. धामारी (ता. शिरूर) येथे आयोजित वळसे पाटील यांच्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमात हे सर्व घडले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही स्थानिक नेते व वक्ते राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर वळसे पाटील यांनी काहीतरी बोलावे व पक्ष एकजूट असल्याचा संदेश जावा, याबाबत अप्रत्यक्षपणे सुचवत होते. राज्य शासनाच्या धोरणावर बोलल्यानंतर वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या फुटीवर भाष्य करण्यास सुरुवात केली.

या वेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. राष्ट्रवादी आपला पक्ष आहे. चिन्ह आपले आहे. शरद पवार आपले नेते आहेत. अजित पवार यांनी भूमिका घेतली आहे. दोन-चार महिने….’ असे म्हणत वळसे पाटील यांनी चालू भाषणात हा संदर्भ सोडून दिला व कांदा अनुदान प्रश्नावर बोलण्यास सुरुवात केली. वळसे पाटील यांच्या भाषणानंतर लगेचच दोन-चार महिन्यांनंतर काय होणार? याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली.

दोन गटांतील चुरशीमुळे वळसे पाटील धामारीत

दिलीप वळसे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडल्याचे शल्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे. धामारी येथेही ‘…आम्ही साहेबांसोबत’ असे फलक शरद पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी लावलेले होते, त्यामुळे येथील अजित पवार समर्थकांनी वळसे पाटील यांना धामारी येथे आणण्याचे नियोजन केले होते. शरद पवारांचा समर्थक असलेला एक गट वळसे पाटील यांच्या या कार्यक्रमापासून दूर राहिला होता.

सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्षांचा दोन्ही गटांकडून सत्कार

धामारी येथे सोसायटीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडदेखील शनिवारीच (दि. 5) झाली होती. त्यांचा सत्कार दिलीप पळसे पाटील यांनी केला. पण, तत्पूर्वी शरद पवार समर्थक बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनीही त्यांचा सत्कार केला. या वेळी शरद पवार समर्थक निकम यांच्यासमवेत उपस्थित होते.

धामारीत घेणार आ. रोहित पवारांची सभा

वळसे पाटील यांच्या कार्यक्रमानंतर शरद पवार गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांची सभा धामारी येथे घेणार असल्याचे सांगितले.

शरद पवार समर्थकांना पोलिसांनी अडकवून ठेवले

वळसे पाटील यांच्यासमोर घोषणाबाजी अथवा गैरप्रकार होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला शिक्रापूर येथे पोलिस चौकीला बोलाविण्यात आल्याचे येथील कार्यकर्त्यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकसभा निवडणूक : सतेज पाटील रत्नागिरी, रायगडचे जिल्हा निरीक्षक

कमरेला पिस्तूल, गुंडासोबत पोलिस उपनिरीक्षकाचा डान्स

‘शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षांत जगदंबा तलवार भारतात आणण्याचे प्रयत्न’

Back to top button