पावसाने निसर्गसौंदर्याला बहर; कडूस परिसरातील चित्र | पुढारी

पावसाने निसर्गसौंदर्याला बहर; कडूस परिसरातील चित्र

तुषार मोढवे

कडूस(पुणे) : खेड तालुक्याचा पश्चिम भाग आणि निसर्गाचे एक वेगळे नाते आहे. पावसाळ्यात खेडची भूमी निसर्गसौंदर्याने बहरते. तालुक्यातील भूमी हिरवळीने नटली असून, पर्यटकांना तिची भुरळ पडली आहे. पावसाळ्यात पर्यटकांची खेडला अधिक पसंती असते. त्यामुळेच येथील निसर्ग सहलींना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

खेड तालुक्याला निसर्गाचे मोठे लेणं लाभले आहे. भीमनेर आणि भामनेर खोर्‍यातील गावांवर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. पावसाळ्यात तर या भूमीला एक वेगळाच साज चढतो. सगळीकडे पसरलेली हिरवळीची चादर, घटमाथ्याशी सतत गळाभेटी करणारे ढग आणि त्या ढगांआडून डोंगर कपार्‍यातून वाहणारे सुंदर धबधबे अशा बेधुंद वातावरणाचा आनंद लुटायला पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.

शेणाचा लेप चढवून सारवलेला कूड, घरापुढे अंगण, पडवी, ओटी आणि त्याच्या बाजूला दोन-तीन खोल्यांतील एखाद्या खोलीत पिकवलेला भात किंवा वैरण वगैरे ठेवण्यासाठी केलेली जागा, मसाला-तांदूळ कुटण्यासाठी तयार केले जाते, उखळ म्हणजेच दळण कांडणाची जागा. घराच्या अगदी मागील बाजूस असलेली पडवी म्हणजे किचन याच पडवीत मातीपासून तयार केलेली ही चूल सारवली याच ठिकाणी लाकूड-फाटी रचून चूल पेटवली जाते. त्याचा अनुभव पर्यटक घेत आहेत.

घर बांधताना चारही बाजूंनी लाकडी म्हेढीचा खांब आधार घेऊन वर तयार झालेला त्रिकोण म्हणजे माळा. या माळ्यावर बांबूपासून तयार केलेल्या टोपल्या पिकवलेला भात, कडधान्य वगैरे भरून ठेवला जात आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वीची जळणासाठी लागणारी फाटीही लाकूड इथेच भरून ठेवली जात आहे. अंगणापासून ते अगदी घराची मागील पडवीपर्यंत शेणाने सारवलेल्या या घरांचं रूपडं आता हळूहळू बदलू लागले आहे. कुडा या मोकळ्या-ढाकळ्या घरांची जागा आता रेती-सिमेंटचा लेप चढवलेल्या बंदिस्त भिंती, चकाचक मार्बल, टाइल्सने घेतली.

हेही वाचा

Nashik : सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उरुळी कांचन : विद्युतीकरणाचा काडीमात्र उपयोग नाही

दौंडच्या शिवभक्तांची पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती

Back to top button