

भिगवण(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्याला हादरुन सोडलेल्या म्हसोबावाडी येथील अवाढव्य विहिरीची रिंग पडून आणि मातीचा ढिगारा कोसळून बेलावडीच्या चार मजुरांच्या मृत्यूप्रकरणी भिगवण पोलिसांनी अखेर विहीर मालक गिरीश विजय क्षीरसागर(३२ रा.सणसर ता.इंदापुर जि.पुणे) याला अटक केली असून ठेकेदार विश्वास गायकवाड(रा.बेलवाडी ता.इंदापुर जि.पुणे) हा फरार झाला आहे. दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक विजय खाडे यांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी याबाबत माहिती दिली. याची थोडक्यात माहिती अशी की, विहीर मालक गिरीश क्षीरसागर याच्या म्हसोबावाडी येथील गट नंबर ३३८ मध्ये विहिरीच्या भोवती रिंग(सरंक्षण भिंत)चे काम चालू करण्यात आले होते. मात्र हे काम करताना क्षीरसागर व ठेकेदार गायकवाड यांनी संगनमत करून व सदरचे काम हे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असताना कामगारांना विहिरीच्या सिमेंट काँक्रीटच्या रिंग बांधण्यासाठी लावले.या विहिरीचा व्याज १२० फूट गोल व रिंग भोवती ५० फूट माती भरली होती.
दि.१ रोजी पूर्व बाजुने ही रिंग ढासळली व त्याच्यासोबत मातीही ढासळली आणि काम करणारे जावेद मुलाणी, सोमनाथ गायकवाड, परशुराम चव्हाण, लक्ष्मण सावंत हे चार कामगार १२७ फूट खोलवर दबून ठार झाले.ढासळला ढिगारा व त्यात गाढलेले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्रशासनाचे तब्बल ६६ तास म्हणजे चार दिवस गेले. त्यानंतर आज शनिवार दि.५ रोजी या दुर्घटने प्रकरणी भिगवण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भिगवण पोलीस करीत आहेत.
हेही वाचा