

नगर : पुढारी वृत्तसेवा : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत सोलापूर विभागातील 11 रेल्वे स्टेशनवर पुनर्विकासाची कामे केली जाणार आहेत. त्यात जिल्ह्यातील अहमदनगर, बेलापूर (श्रीरामपूर) व कोपरगाव या तीन स्टेशनचा समावेश आहे. यासाठी 92 कोटी 82 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या विकासकामांमुळे या रेल्वे स्थानकांचे रूपडे बदलणार आहे. या योजनेचा प्रारंभ रविवारी (दि. 6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ मंडल रक्षा अधिकारी तथा नोडल अधिकारी शिवाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतीय रेल्वे बोर्डातर्फे अमृत भारत स्टेशन योजना 2023 च्या माध्यमातून रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील 15 स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे, बारा फूट फ्लायओव्हर, प्रतीक्षालय, शौचालय, सोलर प्लांट, वाटर कूलर, वातानुकूलित योजना, तसेच डिजिटल घड्याळ, पार्किग, प्रकाश व्यवस्था तसेच 50 वर्षे टिकेल असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले जाणार आहे. सोलापूर मंडलातील 15 स्टेशनसाठी 458 कोटी 33 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
यामधील 92 कोटी 82 लाख रुपये जिल्ह्यातील तीन रेल्वे स्टेशनच्या कामावर खर्च होणार असल्याचे शिवाजी कदम यांनी सांगितले. कदम म्हणाले, की या योजनेच्या माध्यमातून देशभरातील 508 रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाची पायाभरणी होणार आहे. पंतप्रधान मोदी हे ऑनलाईन प्रारंभ करणार आहेत. या वेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, श्रीमती दर्शना जरदोश उपस्थित राहणार आहेत.
नगर रेल्वे स्टेशनवर उद्या कार्यक्रम
या कार्यक्रमावेळी अहमदनगर रेल्वे स्टेशनवर रविवारी सकाळी 9 वाजता स्थानिक कार्यक्रम होणार आहे. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, महापौर रोहिणी शेंडगे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ उपस्थित राहणार आहेत. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा पुरस्कारांचे वितरण केले जाईल. सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले.
हेही वाचा :