वारसांची नोंद आता ऑनलाइन..! एक ऑगस्टपासून सुरू झाली कार्यवाही | पुढारी

वारसांची नोंद आता ऑनलाइन..! एक ऑगस्टपासून सुरू झाली कार्यवाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा : घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नोंद सातबारा उतार्‍यावर घेण्यासाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना घरबसल्या या नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा भूमी अभिलेख विभागाने उपलब्ध करून दिली आहे. महसूल सप्ताहानिमित्त 1 ऑगस्टपासून भूमी अभिलेख विभागाने राज्यभर ही सुविधा सुरू केली आहे.

भूमी अभिलेख विभागाने अधिकाधिक सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. डिजिटल सातबारा उतारा, ई- फेरफार अशा प्रमुख सुविधांचा यामध्ये समावेश आहे. कोरोनानंतर ऑनलाइन सुविधांचा वापरही नागरिकांकडून वाढत आहे. नागरिकांना सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागू नये, यासाठी डिजिटल सातबारा उपलब्ध करून दिला आहे.

आता याच्या पुढील पाऊल म्हणजे कोणत्याही कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून वारसनोंदीची सुविधा आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 ऑगस्टपासून राज्यात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी वारसनोंदीसाठी तलाठी कार्यालयात जाऊन नागरिकांना अर्ज करावा लागत होता.

मृत व्यक्तीनंतर त्यांच्या वारसांची नोंद घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी या संकेतस्थळावर जाऊन लॉगइन करून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. हा ऑनलाइन अर्ज संबंधित गावाच्या तलाठ्याकडे जाईल. तलाठी या अर्जाची ऑनलाइन पडताळणी करतील. कागदपत्रे अपूर्ण असतील, तर त्याची माहिती अर्जदाराला मेलद्वारे कळविण्यात येईल. सर्व कागदपत्रे
पूर्ण असतील, तर तलाठ्यांकडून त्याची नोंद सातबारा उतार्‍यावर घेण्यात येणार आहे.

वारसनोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा 1 ऑगस्टपासून उपलब्ध करून दिली आहे. पुढील टप्प्यात कर्जाचा बोजा दाखल करणे किंवा कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे आदी सुविधांसाठी ई-हक्क प्रणालीतून सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

– निरंजन सुधांशू, जमाबंदी आयुक्त

हेही वाचा

ऊसतोडणी कामगारांना आरोग्य सुविधा द्या

नगर : मंदिरांच्या दानपेट्या फोडणार्‍याला अटक

Back to top button