पुणे; पुढारी वृत्तसेवा : चालू वर्ष 2023-24 च्या ऊसगाळप हंगामात कारखाना परिसरात वास्तव्यास येणार्या ऊसतोडणी कामगारांकरिता, महिला कामगारांकरिता व विशेषतः बालकांकरिता पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी परिपत्रकान्वये दिल्या आहेत. तसेच आरोग्य तपासणीसह वैद्यकीय अधिकारी नियुक्तीच्याही सूचना दिल्या आहेत.
ऊसतोड व वाहतूक कामगारांची आरोग्य तपासणीसाठी तसेच विविध लसीकरण उपक्रमासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. तसेच कारखानास्थळावर वैद्यकीय अधिकार्याची नियुक्त करावी. सर्व साखर कारखान्यांनी गाळप हंगाम 2023-24 करिता ऊस नोंदणी झालेल्या शेतकर्यांची यादी साखर आयुक्तालयामार्फत विकसित करण्यात आलेल्या 'महा-ऊस नोंदणी' अॅपमध्ये ऑनलाइन अपलोड करावी. कारखान्यांनी ऊसतोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार व ऊसतोडणी यंत्रधारकांची माहिती वाहतूकदार व्यवस्थापन अॅपमध्ये भरणा करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
ऊस उत्पादक शेतकर्यांची ऊसतोडणी मजूर किंवा मुकादम तसेच कारखान्याच्या कर्मचार्यांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी शेतकर्यांकडून साखर आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहेत. अशा स्वरूपाच्या तक्रारी यंदाच्या हंगामात येऊ नयेत, म्हणून सर्व साखर कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती अधिकार्यांची नेमणूक करण्याची महत्त्वपूर्ण सूचनाही साखर आयुक्तांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने ऊसतोडणी कामगारांना यापूर्वी लागू केलेली पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ऊसतोडणी व वाहतूक शेतमजूर सुरक्षा विमा योजना अंमलबजावणी करणे किंवा गाळप हंगाम 2023-24 करिता लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळामार्फत ऊसतोडणी कामगारांसाठी विमा योजना कार्यान्वित झाल्यास सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांना योजनेची अंमलबजावणी बंधनकारक राहील. या योजनेत गतवर्षी साखर कारखान्यांनी प्रति टन 3 रुपयांप्रमाणे 39 कोटी 19 लाख रुपये जमा केलेले आहेत.
हेही वाचा