’झटपट वीज कनेक्शन’चा आठ हजार ग्राहकांना लाभ | पुढारी

’झटपट वीज कनेक्शन’चा आठ हजार ग्राहकांना लाभ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नवीन वीज कनेक्शन घेऊ इच्छिणार्‍या ग्राहकांना शहरी भागात चोवीस तासांत, तर ग्रामीण भागात 48 तासांत कनेक्शन देण्याच्या महावितरणच्या मोहिमेत राज्यात जुलै महिन्यात एकूण 8 हजार 63 वीज ग्राहकांना झटपट कनेक्शन मिळाले. यामध्ये अर्ज केल्याच्या दिवशीच कनेक्शन मिळालेल्या ग्राहकांची संख्या 510 असून, 3 हजार 775 ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर
24 तासांत कनेक्शन मिळाले. ग्रामीण भागात 616 ग्राहकांना अर्ज केल्यानंतर तातडीने शुल्क भरल्यामुळे 48 तासांत कनेक्शन मिळाले, तर 3162 ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर 48 तासांत वीजजोडणी मिळाली.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नव्या वीज कनेक्शनसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. याचा भाग म्हणून महावितरणने जून महिन्यात दहा दिवसांत एक लाख नवीन घरगुती वीज कनेक्शन दिली. आता नव्या कनेक्शनसाठी अर्ज करणार्‍या ग्राहकांना शहरी भागात 24 तासांत, तर ग्रामीण भागात 48 तासांत वीज कनेक्शन देण्याचे काम कंपनीने सुरू केले आहे.

ग्राहकांनी नव्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. त्यानुसार शहरी भागातील ज्या ग्राहकांनी शुल्क भरले त्यांना चोवीस तासांत कनेक्शन देण्यावर भर देण्यात आला. राज्यभरात अशा एकूण 3 हजार 775 ग्राहकांना जुलै महिन्यात लाभ झाला. महावितरणकडे अर्ज केल्यानंतर सूचना मिळाल्यावर तातडीने शुल्क भरणार्‍या 510 ग्राहकांना अर्ज केल्याच्या दिवशीच नवीन कनेक्शन मिळाले.

ग्रामीण भागासाठी अंतर व इतर अडचणी लक्षात घेऊन 48 तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागात ज्या ग्राहकांनी तातडीने शुल्क भरले अशा 616 ग्राहकांना अर्ज केल्यानंतर 48 तासांत कनेक्शन मिळाले, तर अर्ज केल्यानंतर आपल्या सोयीने शुल्क भरल्यानंतर 48 तासांत कनेक्शन मिळणार्‍या ग्राहकांची संख्या 3162 आहे.

शेतकर्‍यांनाही झटपट कनेक्शन

कृषी ग्राहकांना वीज कनेक्शन देणे हे पायाभूत सुविधांअभावी तुलनेने अवघड असते. शेतकर्‍यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना जोडणी मिळण्यास विलंब लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी महावितरणने गेल्या वर्षभरात मोहीम राबविली. जुलै महिन्यात राज्यात 1 हजार 227 शेतकर्‍यांना झटपट वीज कनेक्शन मिळाले. त्यापैकी 74 शेतकर्‍यांना अर्ज केल्याच्या दिवशीच, तर 493 शेतकर्‍यांना शुल्क भरल्यानंतर 24 तासांत वीज कनेक्शन मिळाले. अर्ज केल्यानंतर 48 तासांत कनेक्शन मिळालेल्या शेतकर्‍यांची संख्या 117 आहे, तर 543 शेतकर्‍यांना शुल्क भरल्यानंतर 48 तासांत कनेक्शन मिळाले.

हेही वाचा

नगर : मंदिरांच्या दानपेट्या फोडणार्‍याला अटक

ऊसतोडणी कामगारांना आरोग्य सुविधा द्या

छत्तीसगड : एक लाख रूपये बक्षीस असलेल्या नक्षलवादी जोडप्याचे आत्मसमर्पण

Back to top button