पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'पत्रकार हे समाजाचा आरसा असतात. समाजातील परिस्थितीवर परखडपणे भाष्य करण्याचे, अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करतात. मात्र, पत्रकारांना वेतन कमी असल्याने स्वतःची स्वप्ने पूर्ण करताना मर्यादा येतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करू,' असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला. या वेळी मानकर बोलत होते. या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे आदी उपस्थित होते.
मानकर म्हणाले, 'पुण्यात बर्याच ठिकाणी शासकीय जागा आहेत. घरकुल योजनेसाठी त्या जागांची पाहणी केली जाईल. पत्रकार संघातर्फे राज्य शासनाला प्रेस क्लबबाबत निवेदन देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल.'
रूपाली चाकणकर म्हणाल्या, 'पत्रकार आणि राजकारणी या दोन्ही घटकांसाठी वेळ पाळणे महत्त्वाचे असते. राजकारणात कार्यरत असताना बरेचदा इच्छा असूनही प्रत्येक ठिकाणी पुरेसा वेळ देता येत नाही. मात्र, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याला कायम महत्त्व दिले जाते. महिला आयोगाच्या माध्यमातूनही महिलांचे प्रश्न सोडवले जात आहेत.' प्रदीप देशमुख यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांनी मनोगत व्यक्त केले. बाबूराव चांदेरे यांनी आभार मानले.
हेही वाचा