पिंपरी : बिबट्याच्या वावराने ग्रामस्थांत भितीचे वातावरण | पुढारी

पिंपरी : बिबट्याच्या वावराने ग्रामस्थांत भितीचे वातावरण

रावणगाव : पुढारी वृत्तसेवा :  दौंड पूर्वभागातील राजेगाव परिसरातील बिबट्यासदृश प्राण्याचा वावर सध्या स्वामी चिंचोली (ता. दौंड) परिसरात असल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मागील काही दिवसांपासून बिबट्याचा राजेगाव परिसरात वावर होता. याबाबत दौंड वन विभागाकडून उपाययोजना चालू असतानाच बुधवारी (दि. 2) सायंकाळी स्वामी चिंचोली पाटीजवळील धनाजी मत्रे यांच्या शेतात बिबट्या दिसल्याचे अनेकांनी पाहिले. त्यानंतर गुरुवारी (दि. 3)
सकाळी परशुराम होले यांना कालव्याजवळ बिबट्या दिसून आल्याने या भागात व शेतामध्ये काम करणार्‍या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत बिबट्याच्या वावराचे ठसे स्पष्टपणे दिसत असून, वन विभागानेही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. स्वामी चिंचोली गावच्या ग्रामस्थांनी याबाबत दौंडचे वन परिक्षेत्र अधिकारी यांची भेट घेतली. त्यांनी तातडीने वन विभागाच्या कर्मचार्‍यांना पाठवून उपाययोजना करण्याबरोबरच बिबट्यास पकडण्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीने पिंजरा लावण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी दै. ’पुढारी’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा :

लोकसभेत गदारोळ, राजनाथ सिंह यांना मागच्या बाकावर जाऊन मांडावे लागले विधेयक

खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोन बहीण-भावाचा मृत्यू; गाडेकरवाडी येथील घटना

Back to top button