इंग्लंडमध्ये मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन ! महाराष्ट्रातील ५० महिलांचा सहभाग | पुढारी

इंग्लंडमध्ये मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन ! महाराष्ट्रातील ५० महिलांचा सहभाग

धायरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : इंग्लंडमधील लोकांमध्ये भारतीय हँडलूम व हँडमेड दागिन्यांप्रती जागरुकता निर्माण होण्यासाठी लंडनमध्ये येत्या 6 ऑगस्ट रोजी ‘सारी वॉकथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. यात भारताच्या विविध राज्यांतून 500 महिला सहभागी होणार असून, त्यात महाराष्ट्रातील 50 महिलांचा समावेश आहे. या महिला महाराष्ट्रीय संस्कृतीचे महत्त्व तेथील नागरिकांना पटवून देणार असल्याची माहिती पुण्याच्या अनुजा जाधव यांनी दिली.

बंगालमधून 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळ सुरू झाली. तेव्हापासून 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून परिचित आहे. यानिमित्ताने ‘ब्रिटिश वूमन इन सारी’ संस्थेच्या वतीने डॉ. दीप्ती जैन यांच्या नेतृत्वाखाली लंडनमध्ये ‘सारी वॉकथॉन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लंडनमध्ये हा उपक्रम प्रथमच होत असून, यात पाचशे भारतीय महिला सहभागी होणार आहेत. दरम्यान, भारतातील विविध राज्यांमधील महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून लंडन येथील ऐतिहासिक व प्रतिष्ठित स्थळांवरून मार्गक्रमण करणार आहेत. ट्रॅफलगार स्वेअरपासून या रॅलीस सुरुवात होणार असून, लंडनच्या वेस्ट मिनिस्टरमधील ऐतिहासिक पार्लमेंट स्वेअर येथे समारोप होणार आहे.

लावणी नृत्याचेही होणार सादरीकरण

मूळच्या पुण्याच्या असलेल्या अनुजा जाधव व मुंबईच्या रमा कर्मोकर या ‘वॉकथॉन’मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्यासह राज्यातील 50 महिला महाराष्ट्रीय संस्कृतीचे महत्त्व या वेळी पटवून देणार आहेत. पारंपरिक अलंकार, नऊवारी साडी आणि फेटा घालून त्या या रॅलीत सहभागी होणार आहेत. पार्लमेंट स्वेअरमध्ये असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास मानवंदना देऊन पारंपरिक लावणी नृत्यही सादर करणार आहेत.

हेही वाचा

योजनांसाठी निधी मंजूर करा; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

गडहिंग्लजला वाढतोय गुन्हेगारीचा आलेख

जामखेड : अतिवृष्टीग्रस्तांच्या तोंडाला पुसली पाने

Back to top button