राजस्थानच्या तस्कराकडून एक कोटीचे अफिम जप्त | पुढारी

राजस्थानच्या तस्कराकडून एक कोटीचे अफिम जप्त

अशोक मोराळे

पुणे : चितोडगड राजस्थान येथून पुण्यात अफिम या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्काराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पोरवाल रोड लोहगाव परिसरातून बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून तब्बल 1 कोटी 10 लाख 38 हजार रुपये किंमतीचे 5 किलो 519 ग्रॅम अफिम जप्त करण्यात आले आहे.

राहुलकुमार भुरालालजी साहु (वय 32, रा. मंगलवाडा, जि. चितोडगड, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहु हा पुण्यात नेमका कोणाला अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आला होता, याचा तपास पोलिस घेत आहेत.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शहरात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांचे पथक विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान लोहगाव भागातील पोरवाल रोड येथील एस.बी.आय बँक जवळील परिसरात एक व्यक्ती संशयितरित्या थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून राहुलकुमार साहु याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे आफिम हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याच्याकडून तब्बल 5 किलो 519 ग्रॅम अफिम जप्त करण्यात आले.

गुन्हे शाखेने मागील काही दिवसात अंमली पदार्थ तस्कराकडून मोठ्या प्रमाणांत साठा जप्त केला आहे. नुकतेच फुरसुंगी येथून मोहनलाल मेगाराम बिश्नोई (वय 24) याला अटक करून 3 किलो जप्त करण्यात आले होते. यानंतर आता तब्बल एक कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीष गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, दिगंबर चव्हाण, अंमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, संदिप शेळके, महेश साळुंखे, आझीम शेख, युवराज कांबळे, दिशा खेवलकर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा

सांगली : मनपा क्षेत्रात पान दुकानात ड्रग्ज

वारणानगर ९ कोटी चोरी प्रकरणातील संशयित सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा खून

नगरमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली; पोलिस निष्क्रिय : आ. संग्राम जगताप

Back to top button