

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पान दुकानदारांकडून अमली पदार्थ, नशेच्या गोळ्या, तत्सम पदार्थ, वस्तूंची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. ती तत्काळ थांबवण्यात यावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणार्या नोटिसा महापालिका आरोग्य विभागाकडून महापालिका क्षेत्रातील पान दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. या नोटिसीमुळे शहरातील पान दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
ज्या दुकानात अशा प्रकारच्या नशेली पदार्थांची विक्री होत असेल, त्यांचा प्रशासनाने शोध घेऊन कारवाई करावी, असे पान दुकानदारांचे म्हणणे आहे. यासंदर्भात प्रशासनाबरोबर चर्चा करण्यासाठी शनिवारी (दि. 5) बैठक घेण्याचा निर्णय पान दुकानदारांंनी घेतला आहे.
महापालिका क्षेत्रातील अनेक पान दुकानात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाकडे मिळाल्यानंतर यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. जिल्हाधिकार्यांनीही याची गंभीर दखल घेऊन संबंधितावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी पान दुकानदारांना नोटिसा बजावल्या आहेत.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, आरोग्यास घातक असलेल्या खुल्या स्वरूपात तयार होणारा माव्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत पान दुकानदारांनी अमली पदार्थ, नशेच्या गोळ्या तथा तत्सम पदार्थ, वस्तूंची विक्री होणार नाही, याची पूर्ण दक्षता घ्यावी. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत पान दुकानदारांच्या संघटनेकडून शनिवारी अधिकार्यांसोबत महापालिका कार्यालयात बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष युसूफ जमादार यांनी दिली. महापालिका क्षेत्रात सर्वच पान दुकानदार हे अंमली पदार्थांची विक्री करीत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या यंत्रणेमार्फत शोध घेऊन जे दोषी आढळतील त्यांच्यावर जरूर कारवाई करावी. परंतु सर्वच दुकानदारांना वेठीस धरू नये.