

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जबरी घरफोडी केल्यानंतर पसार झालेला अल्पवयीन मैत्रिणीला भेटायला आल्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. त्याच्याकडून 22 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. तर, दुसर्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात 3 लाख 12 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. निंबाळकरवाडी वाघजाईमाता परिसरामध्ये 23 जुलैला चोरट्यांनी केदार बाळकृष्ण सावंत यांच्या घरात चोरी करून 11 लाख 28 हजारांचा ऐवज चोरून नेला.
दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये भारती विद्यापीठ पोलिस शोध पथकाने घटनास्थळापासून 27 कॅमेर्यांची पाहणी केली. त्यानुसार गुह्यात अल्पवयीनांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी मोबाईलदेखील वापरत नसल्याने तांत्रिकदृष्ट्या शोध लागत नव्हता. दरम्यान, अल्पवयीन त्याच्या मैत्रिणीला भेटण्यास कात्रज तलाव येथे येणार असल्याची माहिती धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचिन गाडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.
रिक्षाने प्रवास करणार्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 3 लाखांवर ऐवज जप्त करण्यात आला आहे. सुदर्शन शिवाजी कांबळे (वय 22, रा. वारजे, म्हाडा कॉलनी), ओम सुरेश ढेबे (वय 18, रा. चैतन्यनगर, धनकवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी तरुण आंबेगावमध्ये जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करीत होता. त्या वेळी दोघांनी त्याला चाकूच्या धाकाने लुटले होते. याप्रकरणी अंमलदार अवधूत जमदाडे, चेतन गोरे, नीलेश ढमढेरे यांना आरोपीची माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले असता अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. भारती विदयापीठ पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांत 15 लाख 43 हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे निरीक्षक विजय पुराणिक, सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, वैभव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.
मौजमजा करण्यासाठी आरोपीने एका अल्पवयीन साथीदारासह घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 22 तोळे सोने जप्त केले आहे. तसेच रिक्षा प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटणार्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांत भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तम कामगिरी करीत 15 लाख 43 हजारांचा ऐवज जप्त केला.
– स्मार्तना पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडल 2
हेही वाचा