स्मशानभूमी अडकवली लालफितीत ; या गावात होतात रस्त्यावर अंत्यसंस्कार | पुढारी

स्मशानभूमी अडकवली लालफितीत ; या गावात होतात रस्त्यावर अंत्यसंस्कार

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या उदासीनतेमुळे घेरा सिंहगड (ता. हवेली) च्या आतकरवाडी येथे स्मशानभूमी नसल्याने धो-धो कोसळणार्‍या पावसात रस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. अनेक वर्षांपासून स्मशानभूमी लालफितीत अडकली आहे.
प्रशासनाने संबंधित खात्यात योग्य समन्वयाने तातडीने स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे व नागरिकांनी दिला आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात जोरदार वारे व पावसामुळे अंत्यसंस्कार करताना अडचणी निर्माण झाल्या. त्या वेळी महसूल व वन विभागाने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात स्मशानभूमी उभी राहिली नाही.+

सिंहगड किल्ल्यावर जाणार्‍या डोणजे-आतकरवाडी रस्त्यावरआतकरवाडी येथील ओढ्यालगत अंत्यसंस्कार केले जात आहेत.
जोरदार पावसामुळे ओढ्याला पूर आल्यावर मुख्य रस्त्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. माजी सरपंच पांडुरंग सुपेकर म्हणाले,की धो-धो पावसात रस्त्यावर सरण पाण्याने विझू नये म्हणून तात्पुरते पत्रे टाकून अंत्यविधी करावे लागतात. स्वातंत्र्यपासून ही परिस्थिती आहे. मायबाप सरकारने मृत्यूनंतर होणारी भूमिपुत्रांची हेळसांड थांबवावी. पुणे (भांबुर्डा) वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ म्हणाले,की वनविभागाची जागा स्मशानभूमीसाठी देण्यासाठी जिल्हाधिकारी यांचा रीतसर प्रस्ताव मिळाल्यास वनविभागाला जागेचा निर्णय घेता येणार आहे. घेरा सिंहगड आतकरवाडीची नोंद आदिवासी पाडा किंवा आदिवासी गाव म्हणून सरकारी कागदावर नाही. त्यामुळे स्मशानभूमीला वनविभागाची जमीन देण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत.

हेही वाचा :

PM Modi to BJP MPs | मुस्लिम भगिनींसोबत रक्षाबंधन साजरे करा : पीएम मोदींचे भाजप खासदारांना आवाहन

नगर : कानडगाव दरोड्यातील सहा जणांना अटक

Back to top button