नगर : कानडगाव दरोड्यातील सहा जणांना अटक

file photo
file photo
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे अडीच महिन्यांपूर्वी पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या शाखेच्या (एलसीबी) पथकाने सहा दरोडेखोरांना अटक केली असून, इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या क्राईम मिटिंगमध्ये या दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांच्याकडे सोपविला होता. शोएब दाऊद शेख (वय 25, रा. कानडगाव, ता. राहुरी), गॅसउद्दीन ऊर्फ गॅस रजाउल्ला वारसी (वय 21), नफीस रफीक सय्यद (वय 23, दोघे रा. सिडको, जि. नाशिक), अश्पाक ऊर्फ मुन्ना रफीक पटेल (वय 21), शेखर राजेंद्र शिंदे (वय 24, दोघे रा. कोल्हार, ता. राहाता), मंगेश बबनराव पवार (वय 32, रा. इंदिरानगर, श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

कानडगाव येथील विक्रम संजय मोताळे यांच्या घरावर 18 मे रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. मोताळे कुटुंबीयांसह घरात झोपलेले असताना चेहर्‍यावर रुमाल बांधून आलेल्या सहा ते सात दरोडेखोरांनी गावठी पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल असा 65 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज नेला होता. राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. एलसीबी पथकाने आरोपींचा पेहराव, बोलण्याची पद्धत या बाबींची माहिती घेतली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या कारचा, आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून शोएब दाऊद शेख या संशयिताला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांबद्दल माहिती दिली. नंतर पाच आरोपींना एलसीबीने अटक केली. राहुरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, शिपाई शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर, अरुण मोरे यांनी ही कामगिरी केली.

पाच आरोपी सराईत गुन्हेगार
अटक केलेले पाच आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. सोहेब दाऊद शेख याच्यावर नगर जिल्ह्यात विनयभंगाचा गुन्हा, मंगेश पवारवर नगर व बीड जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण असे तीन गुन्हे दाखल आहेत. सद्दाम शेखवर नगर जिल्ह्यात विनयभंगाचा गुन्हा, गॅसुद्दीन वारसीवर नगर जिल्ह्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.
अश्पाकवर नगर जिल्ह्यात आर्म अ‍ॅक्ट नुसार एक गुन्हा दाखल आहे.

एसपींनी केले कामगिरीचे कौतुक
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कानडगाव येथील दरोड्याचा तपास एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांच्याकडे सोपविला होता. आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली 'एलसीबी'च्या टीमने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक कौशल्याच्या आधारे सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. त्याबद्दल पोलिस अधीक्षकांनी आहेर व त्यांच्या टीमच्या कामगिरीचे कौतुक केले.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी निष्पन्न
दरोडेखोर घटनास्थळावरून सुमारे अर्धा किलोमीटर पळत जाऊन कारमधून वरशिंदे गावाच्या दिशेने पसार झाले होते. एलसीबीच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करून आरोपी निष्पन्न केले. पसार असलेले सलमान आदमाने (रा. श्रीरामपूर), समीर सय्यद (रा. पंचवटी, नाशिक), हासीम खान (रा. सिडको, नाशिक) या तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news