कोथरूडकरांची पिंपरीपर्यंत मेट्रो सफर

कोथरूडकरांची पिंपरीपर्यंत मेट्रो सफर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांनी मोठ्या उत्साहात मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. ज्येष्ठ नागरिक, तरुणाई आणि कुटुंबीयांसह बालचमूने मेट्रोत फिरण्याचा आनंद घेतला.
कोथरूडकरांचा पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर वनाज ते गरवारे असा प्रवास सुरू होता. त्यानंतर मंगळवारी त्यांनी वनाजपासून थेट पिंपरीपर्यंत प्रवास केला, तर अनेक चाकरमानी पिंपरीवरून थेट कोथरूडला आपल्या घरी मेट्रोने परतले.

दुसर्‍या टप्प्याच्या सुरुवातीमुळे दोन शहरे एकमेकांना जोडली गेली असून, पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या वेळी डेक्कन मेट्रो स्थानकावर प्रवासी एस. बी. पाटील आणि त्यांच्या पत्नी जया पाटील म्हणाल्या की, आमचे नातेवाईक रुबी हॉल रुग्णालयात आहेत. त्यांना भेटायला आम्ही डेक्कन येथून रिक्षाने गेलो, तर 100 रुपये आमचे खर्च झाले. मात्र, परत येताना रुबी हॉल स्थानकापर्यंत अवघ्या 20 रुपयांत आलो. तेसुद्धा एसीमध्ये, वाहतूक कोंडीची कोणतीही दगदग न होता आमचा हा प्रवास चांगला झाला.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे, महाविद्यालयीन तरुण या वेळी स्थानकावर पाहायला मिळाले.

या वेळी विद्यार्थी अनिरुध्द राठोड, आशिष चेके, गोपाल परखंदे, गणेश देशमुख, राहुल लोदवाल या तरुणांशी संवाद साधला. ते म्हणाले, या मेट्रोचा आम्हाला प्रवासासाठी खूप फायदा होणार आहे. कमी पैशात चांगली सुविधा आम्हाला मिळाली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news