विश्वासाच्या वातावरणामुळे देशाचा वेगाने विकास : मोदी

विश्वासाच्या वातावरणामुळे देशाचा वेगाने विकास : मोदी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  देश स्वतंत्र होऊ शकतो, हा विश्वास लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये पहिल्यांदा निर्माण केला. त्यांचा लोकांवर विश्वास होता. असाच लोकांच्या कर्तृत्वावर, प्रामाणिकपणावर आमचाही विश्वास आहे. देशात विश्वासाने भरलेले सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. यामुळेच देश विकासाकडे वेगाने वाटचाल करीत आहे. लोकमान्य टिळकांच्या विचारांमधील देश निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळेच लोकमान्यांच्या नावे पुरस्कार मिळणे ही सौभाग्याची गोष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. या सोहळ्यात इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तोंड भरून पंतप्रधान मोदी यांची स्तुती केली.

स. प. महाविद्यालय येथे पंतप्रधान मोदी यांना 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, विश्वस्त माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,
डॉ. रोहित टिळक, गीताली टिळक, डॉ. प्रणिती टिळक आदी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारात मिळालेली रक्कम मोदींच्या सूचनेनुसार 'नमामि गंगे' प्रकल्पाला देण्यात आली आहे.

मोदी म्हणाले की, पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आणि आदर्श जोडलेले आहेत. अशा भूमीत लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे, हे आपले सौभाग्य आहे. टिळकांनी इंग्रजांची भारतीयांबद्दलची मते खोटी ठरवली आणि जनतेत स्वातंत्र्यासह प्रगतीचा विश्वास पेरला. तसेच आम्हीदेखील भारतीयांवर विश्वास दाखविला आहे. त्यासाठी मुद्रा लोन कोणत्याही गॅरंटीशिवाय दिले जात आहे; तर कागदपत्रे साक्षांकित करण्यासाठी लोकांच्या सहीची आवश्यकता न ठेवता संबंधितांचीच सही घेण्याचा निर्णय घेतला. देशात काशी आणि पुण्याची विशेष ओळख आहे. पुण्यात विद्वत्ता चिरंजीव आहे. त्यामुळे विद्वत्तेच्या नगरीत सन्मान होणे यापेक्षा जीवनात दुसरा आनंद असू शकत नाही. परंतु, जीवनात कोणताही पुरस्कार मिळाला तर जबाबदारीही वाढत असते. हा पुरस्कार 140 कोटी लोकांना समर्पित करतो. तसेच देशातील नागरिकांची सेवा करताना त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नाही.

मोदी पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याची दिशाच बदलली. भारतीय लोक हा देश चालवू शकत नाहीत, असे ज्यावेळी इंग्रज म्हणायचे, त्यावेळी टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क असल्याचे ठणकावून सांगितले. टिळकांच्या कार्यामुळे लोकांनी त्यांना केवळ लोकमान्यता दिली नाही, तर लोकमान्य हा किताबदेखील दिला. महात्मा गांधी यांनीही त्यांचा आधुनिक भारताचे जनक म्हणून गौरव केला. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यातील वर्तमानपत्रांचे महत्त्व ओळखून 'केसरी' आणि 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू केली. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांसोबत लढा देतानाच समाजातील वाईट प्रथांविरोधातही त्यांनी लढा दिला.

गीतारहस्याच्या माध्यमातून त्यांनी कर्मयोग सोप्या पद्धतीत सांगितला. लोकमान्य टिळकांना समृद्ध, बलाढ्य, कर्तृत्ववान देशाची निर्मिती अपेक्षित होती. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी त्याकाळी स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला. त्यापैकी महत्त्वाचे उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे होत. व्यवस्थानिर्मितीकडून संस्थांची निर्मिती, संस्था निर्मितीतून व्यक्तिनिर्मिती आणि व्यक्तिनिर्मितीतून राष्ट्रनिर्मिती हे व्हिजन राष्ट्राच्या भविष्यासाठी पथदर्शी असते. त्यावर आज देश प्रभावीपणे वाटचाल करीत आहे. देशातील लोकांच्या विश्वासाने आणि प्रयत्नांमुळेच देश आज जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. टिळक यांनी लोकमान्य टिळक यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य यांची ओळख करून दिली. तसेच 41 वा पुरस्कार मोदी यांना प्रदान करण्यामागील भूमिका विशद केली.

मोदी-शरद पवार सलगीची चर्चा
नरेंद्र मोदी व्यासपीठावर आल्यानंतर सर्व मान्यवरांची भेट घेत शरद पवार यांच्याजवळ आले. त्या दोघांमध्ये हास्यविनोदही झाला आणि शेवटी मोदी पुढे जात असताना पवारांनी त्यांच्या पाठीवर हलकेच थाप मारली. या दोन नेत्यांमधील सलगीची चर्चा चांगलीच रंगली होती.

अजित पवारांच्या दंडावर थाप
नरेंद्र मोदी हे अजित पवार यांच्याजवळून जात असताना पवार नमस्काराच्या मुद्रेत उभे होते. मोदींनी त्यांच्या दंडावर थाप मारली; पण बहुदा अजित पवारांना त्याची कल्पना नसल्यामुळे ते थोडेसे हलले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news