अवसरीतील टोमॅटो उत्पादक झाला मालामाल

मंचर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील राजेंद्र किसन वायाळ हे शेतकरी टोमॅटोमुळे लखपती झाले आहेत. 20 किलोच्या क्रेटला 2 हजार रुपये भाव मिळत आहे. दररोज त्यांचे 12 ते 15 क्रेट विक्रीस जात आहेत. त्यातून त्यांना अंदाजे तीस हजार रुपये मिळत आहेत. बाजारभाव असाच राहिल्यास त्यांना अडीचशे कॅरेट उत्पादनातून खर्च वजा जाता पाच लाख रुपयांचा नफा मिळण्याची शक्यता आहे. राजेंद्र वायाळ यांनी 15 मे रोजी बारा गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. उत्पादन चांगले मिळावे म्हणून शेणखतासह रासायनिक खते वापरली.
दिलीप दादाभाऊ केदारी यांच्या मदतीने शेतीची मशागत केली. वायाळ, केदारी गेली आठ दिवसांपासून टोमॅटोची तोडणी करीत आहेत. दररोज बारा ते पंधरा कॅरेट टोमॅटो त्यांना मिळत आहे. सदर टोमॅटो नारायणगाव येथील मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी पाठविले जातात. वायाळ यांनी मेघदूत जातीच्या टोमॅटोची लागवड केली आहे. पुढील एक महिना टोमॅटो उत्पादन सुरू राहणार आहे. बारा गुंठ्यांत अंदाजे पाच लाख रुपये मिळतील असा त्यांचा अंदाज आहे. मागील वर्षी टोमॅटोला बाजारभाव नसल्याने शेतकर्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली होती. यंदा मात्र टोमॅटोमुळे शेतकर्यांना चांगलाच फायदा होत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी खूश आहे.
हायमास्ट लावून राखण
टोमॅटोचा भाव गगनाला भिडला आहे. वीस किलो टोमॅटोच्या कॅरेटला दोन हजार ते बाविसशे इतका बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटोची रात्रीच्या वेळेस चोरी होऊ नये म्हणून मर्क्युरी किंवा हायमास्ट दिवे लावले जात आहेत. काही शेतकरी रात्र जागून बागांची राखण करीत आहेत.
हेही वाचा :
Goa Assembly Monsoon session : गोवा विधानसभेमध्ये धक्काबुक्की; विरोधी आमदार दोन दिवसांसाठी निलंबित
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर पुन्हा दरड कोसळली | Pune-Mumbai expressway