भोर : कार दुर्घटनेतील युवक अद्याप बेपत्ताच | पुढारी

भोर : कार दुर्घटनेतील युवक अद्याप बेपत्ताच

भोर : पुढारी वृत्तसेवा :  भोर-महाड मार्गावरील वारवंड (ता. भोर) हद्दीत कार निरा देवघर धरणात पडून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत एक जण बचावला. ही घटना शनिवारी (दि. 29) सकाळी घडली. या अपघातात बेपत्ता असलेला स्वप्निल शिंदे (वय 27, रा. हडपसर, पुणे) हा अजून सापडलेला नाही. या अपघातातील अक्षय धाडे व हर्षप्रीत बाबा या दोघांचे मृतदेह सापडले, तर बचावलेला संकेत जोशी किरकोळ जखमी आहे. त्यांच्या सोबत असणारा शिंदे हा अपघात झाल्यापासून बेपत्ता आहे. त्याचा अजून शोध लागलेला नाही. रविवारी (दि. 30) सकाळपासून भोईराज जल आपत्तीचे जवान व भोर पोलिस त्याचा शोध घेत होते.

परंतु, स्वप्निल सापडला नाही. संध्याकाळी शोधकार्य थांबवण्यात आले. सोमवारी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनास्थळी भोर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बळीराम सांगळे, पोलिस हवालदार उद्धव गायकवाड, विकास लगस, यशवंत शिंदे, वारवंड व शिरगावचे पोलिस पाटील सुधीर दिघे व भाउसो उब्राटकर, स्वप्निल शिंदेचे नातेवाईक उपस्थित होते.

आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हा दाखल करणार
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वरंधा घाटमाथ्यावर वाहनांना बंदी आहे. निगुडघर येथे चेक पोस्ट असतानाही अनेक वाहनचालक आदेशाचे उल्लंघन करून घाटमाथ्यावर पर्यटनासाठी जात आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हा दाखल करून आर्थिक दंड ठोठावणार असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.

संरक्षक कठड्यांचा अभाव
संरक्षक कठडे असते, तर अपघातातील व्यक्ती बचावल्या असत्या, कोट्यवधी रुपये खर्च करून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडकडे जाणार्‍या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, वरंधा घाटातील नागमोडी रस्त्यावरील दुर्घटनाग्रस्त ठिकाणी कठडे नसल्याने अपघातातील कार धरणात कोसळ्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

नाशिक : शस्त्रक्रिया करायची होती उजव्या पायाची, डॉक्टरने कापला डावा पाय

पुणे : मस्तानी तलाव अद्यापही भरेना !

Back to top button