पुणे : जुलै महिना संपला, तरी ओढे कोरडे | पुढारी

पुणे : जुलै महिना संपला, तरी ओढे कोरडे

कोंढवा : पुढारी वृत्तसेवा :  उंड्री, पिसोळी परिसरात यंदा अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी ओढे, नाले, विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ झाली नसल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जुलै महिना संपत आला असला, तरीही या भागातील ओढे कोरडे ठणठणीत आहेत.

जमिनीतून पालेभाज्या व अन्य पिके घेणारे या भागातील शेतकरी पाण्यासाठी मुळा-मुठा नदीला जाऊन मिळणार्‍या ओढ्यांवर अवलंबून आहेत. या ओढ्यांच्या परिसरात शेतकर्‍यांनी विहिरी व बोअरवेल खोदले आहेत. मात्र, यंदा पावसाअभावी अद्यापही ओढे कोरडे ठणठणीत असल्यामुळे पाण्याचे स्रोत कोरडे पडत चालले आहेत. यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरवर्षी जुलै महिन्यात या भागात भाजीपाला, फळभाज्या व फुलांचे मळे फुललेले दिसून येतात. यंदा मात्र अद्यापही पुरसा पाऊस पडला नसल्यामुळे काही शेत, जमिनी ओसाड पडल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवेघाटापर्यंत अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

पालेभाज्यांच्या उत्पन्नात घट

परिसरातील बहुतांशी जमिनीवर बांधकाम व्यावसायिकांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्या आहेत. मात्र, आज ही काही भूमीपुत्र जमीन कसून, त्यातून उत्पन्न घेत आहेत. नैसर्गिकरित्या फळभाज्या व पालेभाज्या पिकवणारे अनेक शेतकरी या पट्ट्यात आहेत. दररोज उत्पन्न मिळवून देणार्‍या पालेभाज्या घेण्याकडे या शेतकर्‍यांचा कल असतो. यंदा मात्र पावसाअभावी पालेभाज्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

हेही वाचा :

वर्क फ्रॉम होममुळे आजारांना निमंत्रण; शारीरिक हालचाली कमी झाल्याचा परिणाम

नाशिक क्राईम : बंदुकीचा धाक दाखवून 97 हजार लुटले

Back to top button