नाशिक क्राईम : बंदुकीचा धाक दाखवून 97 हजार लुटले | पुढारी

नाशिक क्राईम : बंदुकीचा धाक दाखवून 97 हजार लुटले

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा 

येथील चोरडीया सदनमधील ग्राहक केंद्र चालकास अज्ञात व्यक्तीने दवाखान्यात पैसे ट्रान्सफर करायचे आहे, असे कारण सांगून त्यांच्या गाडीत बसून बंदुकीचा धाक दाखवत गाडी वेगवेगळ्या रस्त्याने फिरवली. तसेच त्यांच्याकडील सोन्याची चेन, मोबाईल, रोख रक्कम व एटीएम कार्ड घेऊन सुमारे ९७ हजाराची जबरी चोरी केली.

जेलरोड, बालाजी नगर येथ राहणारे शिवाजी बापूराव पवार यांचे दुर्गा उद्यान समोरील चोरडिया सदनमध्ये ग्राहक सेवा केंद्र आहे. पवार यांनी गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे साडे आठच्या सुमारास केंद्र बंद केले. रस्त्यावर लावलेल्या स्वीफ्ट गाडीने घरी जाण्यासाठी ते निघाले. यावेळी काळ्या रंगाचे जॅकेट घातलेला, मास्क लावलेला, पाच फूट इंचीचा इसम त्यांच्याजवळ आला. दवाखान्यात अर्जन्ट ३५ हजार पाठवायाचे आहे असे त्याने पवारांना सांगितले. पवार यांनी माझ्या खात्यात पैसे नाही. रोख द्यावे लागतील असे सांगितले. यावेळी त्या इसमाने तुमची गाडी उघडा, माझ्याकडे पैसे आहेत, लगेच रोख देतो असे सांगितले. पवार हे चालक सीटवर बसले. बाजूला तो इसम बसला. त्याने बॅगेतून पैसे ऐवजी बंदूक काढून पवार यांना धमकावत मी सांगेन तशी गाडी चालव नाही तर मारून टाकेन, असे धमकावत बिटको सिग्नलच्या दिशेने गाडी नेली. तेथून सेंट झेवियर स्कूल, जयभवानी रोड, आर्टिलरी सेंटररोड मार्गाने पुन्हा ग्राहक केंद्राजवळ पवारांना आणले. तेथून पुन्हा बिटको सिग्नल, डीजीपी नगर सिग्नल, वडाळामार्गे पाथर्डी फाटा, मुंबई महामार्गावर दारणा हॉटेलजवळ गाडी थांबविण्यास सांगितली. गाडी थांबल्यावर त्या इसमाने पवारांच्या गळ्यातील साडे सतरा ग्रॅमची चेन, दोन हजार रुपये रोख, मोबाईल, स्टेट व अँक्सिस बॅँकेचे एटीएम कार्ड बळजबरीने घेतले. एटीएमचा पीन सांग, नाही तर मारून टाकेन, असा दम दिला. तेथून गाडीने उतरून रस्त्याच्या कडेने तो पळून गेला.

त्यानंतर त्या इसमाने एटीएम कार्डचा वापर करून 37 हजार पाचशे रुपये काढले. अचानक घडलेल्या या घटनेने शिवाजी पवार घरी आले. पत्नीला व नातेवाईकांना घटना सांगितली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवून ९७ हजाराचा एवज जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला

Back to top button