भीमाशंकर येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद ; अधिक श्रावण यात्रेच्या सुरक्षेचा प्रश्न | पुढारी

भीमाशंकर येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद ; अधिक श्रावण यात्रेच्या सुरक्षेचा प्रश्न

भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा :  श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्याने दरवर्षी या ठिकाणी शिवभक्तांची मोठी गर्दी होत आहे. यातच मंदिर, सभामंडप व दर्शन बारीत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने अधिक श्रावण यात्रेच्या गर्दीत सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनादी काळापासून येथे श्रावण महिना यात्रा उत्साहात साजरी होते. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन पवित्र मानले जात असल्याने दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा महापूर आहे. मद्यसेवन करणार्‍या व हुल्लडबाजी करणार्‍या पर्यटकांची संख्या येथे वाढली आहे. पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. परंतु मंदिर गाभारा, सभामंडप व पायरी मार्गावरील 19 सीसीटीव्ही कॅमेर्‍यापैकी केवळ 2 ते 3 कॅमेरेच सुरू असून, त्यामध्ये रेकॉर्डिंग होत नाही, तर बाकीचे बंद पडले आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे.

यातच भीमाशंकर येथे येणा-या भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी 148 कोटी रुपयांचा भीमाशंकर परिसर विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यापैकी 70 कोटींची कामे सुरू असून, यातील महत्त्वाचा पायरी मार्ग, प्रवेशव्दार याचे सध्या काम चालू आहे. या ठिकाणी बसविण्यात आलेले नवीन पथदिवेदेखील बंद आहेत. यातील किती पथदिवे हे ठेकेदार व देवस्थान समितीच्या कृपाआर्शीवादाने स्थानिकांच्या घरांकडे बसविले आहेत. कोंढवळ फाटा ते निगडाळे या मुख्य मार्गावर अंधार आहे. यामुळे येथे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊन एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भीमाशंकरला श्रावण महिना, त्रिपुरारी पौर्णिमा, महाशिवरात्रीसह अन्य दिवशीदेखील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. गर्दीच्यावेळी पायरीमार्ग ते मंदिर दर्शनासाठी भाविकांना तीन ते चार तास उभे राहावे लागते. विकास आराखड्यामध्ये कोणतेही शौचालय, पाण्याची सोय यांचे काम घेण्यात आले नाही, हीदेखील गंभीर बाब आहे.

एलसीबी पथकाच्या तपासणीत उघड
तळेघर येथे झालेल्या घरफोडीच्या अनुषंगाने एलसीबी पथकाने तपास सुरू केला होता. या वेळी संशयित हे मंदिर परिसरात दर्शनाकरिता आल्याचे त्यांना कळले होते. या वेळी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले असता मंदिर परिसरातील बहुतांशी सीसीटीव्ही हे बंद होते आणि रेकॉर्डिंग झालेले नव्हते.

याबाबत पोलिसांनी व्यवस्थापन करणार्‍या देवस्थान संस्थानाच्या लोकांशी संपर्क केला होता. त्यांनी माकडे सीसीटीव्ही कॅमेरे हलवतात, असे उत्तर दिले होते. परंतु श्रावण महिन्याच्या काळात जर सीसीटीव्हीसंबंधी एखादा माणूस प्रशासन व देवस्थानाच्या वतीने नेमला अन् पूर्ण महिनाभर सीसीटीव्ही व्यवस्थित कार्यरत राहिले तर पोलिसांच्या कामाचा ताण कमी होईल आणि भाविकांची सुरक्षा व गर्दीवर लक्ष ठेवता येईल.

हेही वाचा :

ठरलं तर ! पुणेकरांची पाणीकपात टळली ; पालकमंत्र्याच्या बैठकीत निर्णय

पुणे : गंगाधाम चौपाटी ठरतेय डोकेदुखी

Back to top button