राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील उंबरे परिसरातील दोन अल्पवयीन मुलींवर धर्मांतरासाठी दबाब टाकण्यासह विनयभंगप्रकरणी क्लासच्या शिक्षिकेसह सात ते आठ जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींनी स्वतंत्र फिर्याद दिल्याने दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत 15 वर्षीय व 16 वर्षीय दोन अल्पवयीन मुलींनी दिलेल्या दोन स्वतंत्र फिर्यादीवरून आवेज शेख, कैफ शेख, हिना शेख, सोहेल शेख, शाकिर सय्यद, सलिम पठाण, हुसेन शेख, अल्ताफ शेख, आलिशा शेख (सर्व रा.उंबरे, ता.राहुरी) यांच्याविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या दोन्ही मुली गेल्या दोन वर्षांपासून हिना शेख हिच्याकडे क्लासला जात होत्या. त्यावेळी आवेज शेख हा त्यांचा पाठलाग करून छेड काढत असे. क्लासमध्ये गेल्यावर हिना शेख ही आवेज शेख याच्याशी जाणीवपूर्वक बोलायला लावून त्यास चिथावणी देत असे.
यानंतर आवेज शेख याने इन्स्टाग्राम अकाऊंट, तसेच फोनवरून तिच्या घरच्यांना गुंतविण्याची धमकी देत बळजबरीने ओळख केली. नंतर, सर्व आरोपींनी मुलीस धर्मांतर करून आवेश शेख याच्याशी लग्न करण्यास सांगितले. तसेच, एका रात्री आवेश शेख याने पहिल्या मुलीच्या घरामागे येत तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तसेच, हिना शेख हिने दुसर्या मुलीसही आवेज शेख याच्याशी बोलण्यास प्रवृत्त केले. तर, आलिशा शेख हिने आवेज शेख याच्या मोबाईलवरून या मुलीस फोन करून वेळोवेळी आवेज शेखशी बोलणे करून दिले. फोनवरून अश्लील बोलून आवेज शेख याने या मुलीचाही विनयभंग केला. तसेच, या सर्वांनी तिलाही धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र लोखंडे व उपनिरीक्षक निरजकुमार बोकील करीत आहेत.
हेही वाचा