पिंपरी : वल्लभनगर आगारावर अष्टविनायकाची कृपा | पुढारी

पिंपरी : वल्लभनगर आगारावर अष्टविनायकाची कृपा

राहुल हातोले

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर एसटी आगारामधून दर महिन्याला अष्टविनायक दर्शनासाठी बसची सोय केली जाते. या दर्शनबसच्या माध्यमामधून वल्लभनगर आगाराला जानेवारी 2023 ते जुलै अखेरपर्यंत 4 लाख 59 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. भाविकांचा मिळणार्‍या प्रतिसादाद्वारे आगारावर अष्टविनायकाची कृपा असल्याचे मत आगारप्रमुखांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने अष्टविनायक, महाबळेश्वर व अकरा मारूती दर्शन बसेस सोडल्या जातात; मात्र अष्टविनायक दर्शनासाठी दर संकष्टी चतुर्थीला विशेष बसची सोय करण्यात येते. सुरक्षित आणि कमी दरात सेवा देणार्या एसटीच्या लालपरीवर प्रवाशांचा विश्वास कायम आहे. त्यामुळे या बसला कायम प्रवाशांची गर्दी असते. पिंपरी-चिंचवड शहरातील भाविकांची संख्या पाहता बर्याचदा प्रवाशांच्या मागणीनुसार दोनहून अधिक बसची सोय करावी लागत असल्याची आगारप्रमुखांनी सांगितले.

या विशेष बसने एकूण 14 फेर्‍यांमधून 10 हजार 530 कि. मी. चे अंतर पार करीत, जानेवारी महिन्यापासून अद्यापपर्यंत एकूण चार लाख 59 हजार 203 रुपयांचे उत्पन्न एसटीच्या तिजोरीत जमा झाले आहे. दर्शन बसने प्रवास करणार्‍यांना कमी दरात उत्तम भोजनाची सोय केली जाते. तसेच ओझर येथे भक्त निवासामध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

अंगारकीला धावल्या आठ बसेस

जानेवारी महिन्यातील अंगारकी चतुर्थीच्या दिवशी प्रवाशांची मागणी पाहता वल्लभनगर आगारामधून एकूण आठ एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. बसमधील सर्व सीट प्रवाशांनी भरल्या होत्या.

आगाराच्या वतीने अष्टविनायक दर्शनासाठी सुरू करण्यात आलेल्या बसला प्रवाशांची अधिक पसंती आहे. त्यामुळे बर्याचदा प्रवाशांच्या मागणी नुसार दर्शनासाठी वेळेवर ज्यादा बसची सोय केली जाते.

– संजय वाळवे, आगारप्रमुख, वल्लभनगर, पिं. चिं. शहर.

Back to top button