अहमदनगर : झेडपीत 937 जागांची मेगाभरती! | पुढारी

अहमदनगर : झेडपीत 937 जागांची मेगाभरती!

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही दिवसांपासून हजारो सुशिक्षित बेरोजगारांचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदेतील पदभरतीला आता मुहूर्त सापडला आहे. लवकरच 937 जागांची ही भरती केली जाणार असून, त्यासाठी शासन स्तरावर हालचालींना वेग आला आहे.
जिल्हा परिषदेतील रिक्त जागांची पदभरती करण्यासाठी प्रशासनाने बिंदुनामावलीपासून आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी आयबीपीएस या एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. ही कंपनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे, परीक्षा घेणे व अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी दिली.

विभागनिहाय भरावयाची पदे व जागा

  • आरोग्य विभाग : आरोग्य सेवक, हंगामी फवारणी, कर्मचारी, परिचारिका आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ; 727
  • सामान्य प्रशासन विभाग : कनिष्ठ सहायक, लघुलेखक (उच्चश्रेणी); 14
  • अर्थ विभाग : कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ सहायक (लेखा); 27
  • बांधकाम व पाणीपुरवठा विभाग : कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक; 64 जागा.
  • कृषी विभाग : विस्तार अधिकारी; 1
  • पशुसंवर्धन विभाग : पशुधन पर्यवेक्षक; 42 जागा.
  • ग्रामपंचायत विभाग : कंत्राटी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी (सांख्यिकी); 56 जागा.
  • महिला व बालकल्याण विभाग : मुख्य सेविका, पर्यवेक्षिका; 6 जागा.

परीक्षा शुल्क ठरणार कळीचा मुद्दा!

जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी परीक्षा शुल्क म्हणून एक हजार रुपये आकारण्याचा निर्णय होऊ शकतो, असे संकेत आहेत; मात्र नुकतेच तलाठी पदाच्या परीक्षा अर्जासोबत एक हजार रुपये शुल्क आकारण्यात आल्याचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटले. त्यामुळे झेडपीतील भरतीसाठी परीक्षा शुल्क कमी असावे, अशी मागणी होण्याची शक्यता आहे.

Back to top button