पुणे : सांडपाण्याला मार्ग सापडेना ; इमारतीच्या तळमजल्यात साचले15 फुटांपर्यंत पाणी | पुढारी

पुणे : सांडपाण्याला मार्ग सापडेना ; इमारतीच्या तळमजल्यात साचले15 फुटांपर्यंत पाणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इमारतीच्या तळमजल्यात 15 फुटांपर्यंत साचलेले ड्रेनेजचे पाणी, पाण्यामुळे दुर्गंधी तसेच डासांचा प्रादुर्भाव, साचलेल्या पाण्यामुळे बंद पडलेली लिफ्ट तसेच ट्रान्सफॉर्मरपर्यंत पोहोचलेले सांडपाणी, अशा विविध अडचणींचा डोंगर जंगली महाराज रस्त्यावरील कमला आर्केडमधील रहिवाशांसमोर उभा राहिला आहे.

शिवाजीनगर येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात कमला आर्केड नावाची सहा मजली इमारत आहे. या ठिकाणी कपडे, ड्रायफ्रूट, मेडिकल आदी 17 दुकाने, तर 40 हून अधिक विविध कार्यालये आहेत. या ठिकाणाहून जाणार्‍या ड्रेनेजमधील पाण्याचा निचरा होत नसल्याने मागील तीन महिन्यांपासून इमारतीच्या तळमजल्यावर ड्रेनेजचे पाणी साचू लागले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची त्यात भर पडल्याने सद्य:स्थितीत येथील पाणी पंधरा फुटांपर्यंत गेल्याने तळमजल्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.

इमारतीचा तळमजला पूर्णपणे पाण्यात गेल्याने या ठिकाणी पाणी काढण्यासाठी असलेल्या पंपाची बटणे तसेच नवीन पंपही पार्किंग परिसरातच असल्याने दोन्ही पंप सुरू करता येत नाहीत. परिसरात सुरू असलेल्या महामेट्रोच्या कामामुळे ड्रेनेजलाइन बंद झाल्याने पाण्याला जाण्यास मार्ग नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर, पाणी साचण्याशी महामेट्रोशी काहीही संबंध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे कमला आर्केडचे सचिव उमेश कुर्तकोटी यांनी सांगितले.

पाणी तुंबल्याचे कारण सापडेना

याबाबत घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर पाणी कशामुळे तुंबले, याचा शोध लागत नसल्याचे उत्तर मिळत असल्याने आणखी किती दिवस या परिस्थितीत दिवस काढायचे, असा सवाल येथील गाळाधारक व कार्यालयातील कर्मचार्‍यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

दाद कुणाकडे मागावी?
दिवसेंदिवस परिस्थिती अतिशय बिकट होत चालली असून, सांडपाण्याबाबत घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार देऊनही प्रशासनाकडून चालढकल करण्यात येत असल्याने या प्रकरणात दाद मागायची कोणाकडे? असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

हेही वाचा :

पुणे : पेन्शनच्या नादात गमाविले सात लाख

पुणे : सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचा मूळ उद्देशच फिरवला !

Back to top button