पुणे : सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचा मूळ उद्देशच फिरवला ! | पुढारी

पुणे : सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचा मूळ उद्देशच फिरवला !

पुणे : स्वातंत्र्य आंदोलनापासून, शिक्षण ग्रामविकास, व्यसन निर्मूलन, पत्रकारिता, आदिवासी सेवा, श्रमिक विकास, कृषी विकास तसेच नैसर्गिक आपत्ती, वेळोवेळी निर्माण होणार्‍या देशातील समस्यांवर कार्य करण्याच्या उद्देशाला संस्थेच्या पदाधिकार्‍यांनीच काळिमा लावण्याचा प्रताप केल्याचे सांगत काही सदस्यांनी हे प्रकरण न्यायालयापर्यंत नेले. दै. ’पुढारी’ने वृत्त मालिकेतून वाचा फोडताच अनेकांनी थेट माहिती पुरवली असून, नवनवे प्रताप समोर आले आहेत. यात नागपूरच्या जागेसह पुण्यातील जागेवरून केल्या जात असलेल्या नियमबाह्य कामावर प्रकाश टाकला आहे.

राष्ट्र व्यवस्थापन आणि राष्ट्र सेवा कार्य या मुख्य हेतूने 12 जून 1905 मध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी ही सार्वजनिक संस्था स्थापन करून एफ- 149 नुसार तिची नोंद करून घेतली. या संस्थेचे सदस्य देशसेवा, देशभक्ती आणि रचनात्मक कार्य भारतभर उभे राहावे म्हणून आजीवन संस्थेच्या घटनेनुसार कार्य करीत असतात. मात्र 1990 मध्ये दाखल झालेले मिलिंद

भगवान देशमुख यांच्या कौटुंबिक खेळीमुळे संस्थेच्याच पदाधिकार्‍यांनी सर्व प्रकरण न्यायालयात नेले. देशमुखांनी केलेली खेळी त्यांच्यावरच उलटत असून, त्यांच्या मेहुण्यासह मित्राने दै. ‘पुढारी’कडे बाजू मांडत त्याच्याशी आपला संबंध नसल्याचे कळवले आहे. काही सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती पुरविली असून, शहानिशा केल्यावर त्यात तथ्य असल्याचे समजते.

संस्थेच्या संपत्तीच्या विक्रीतून जमवलेल्या रकमेतून पुणे येथील गोखले संस्थेच्या प्रांगणात उभारलेल्या इमारतीत देशमुख यांनी सर्व नियमांची पायमल्ली करून स्वतःच्या मुलास व्यवस्थापक म्हणून नेमले आहे. संस्थेच्या आवारात भाडे स्वीकारून वेगवेगळ्या चित्रपटांचे शूटिंग केले जाते. मात्र, या उत्पन्नाचा हिशोब संस्थेच्या नोंदीत दाखवला गेला नसल्याचे समजते.

देशमुख यांनी सरकारचा आयकर बुडवून संस्थेच्या आवारात सुरू केलेले ’हॉटेल अमेय’ही स्वतःच्या मुलास अप्रत्यक्षरीत्या चालवण्यास दिले आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील सर्वच व्यवसायधारकांनी इमारतीच्या साईड मार्जिनमध्ये अनधिकृतपणे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे गोखले इन्स्टिट्यूटच्या ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य नष्ट झाल्याचे दिसते.

नागपूरच्या जागेबाबतही तशीच खेळी….
संस्थेच्या तत्कालीन पदाधिकार्‍यांनी 2018 मध्ये नागपूर येथील जागा विकण्यासाठी तेथील पदाधिकारी कै.आर .व्ही. नेवे यांच्यावर दबाव आणला होता. संस्थेच्या जागेत पोस्ट ऑफिस आणि दैनिक वृत्तपत्र यांचे काम चालते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जागेस मोठे उत्पन्न मिळत असतानाही पुरेसे भाडे मिळणे अपेक्षित होते. तसेच अमरावती येथील शेंदुर्जना बाजार येथे ग्रामीण विकास केंद्र सुरू असताना ते बंद पाडण्यात आल्याचे समजते

पुण्यातील या आहेत जागा
पुण्यातील अतिशय गजबजलेल्या लक्ष्मी रोडवरील ‘गोखले हॉल’ या अतिशय देखण्या ऐतिहासिक वास्तूचा वापर समाजोपयोगी उपक्रमांसाठी करण्याऐवजी त्याचा वापर फर्निचरच्या व्यवसायासाठी केला जात आहे. या दुकानदाराने वास्तूची दुरवस्था केली असून, त्याचे मिळणारे उत्पन्नही लपवले जात असल्याचे समजते. वास्ताविक पाहता, जागेच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करताना जाहीर निविदा मागवून जास्त भाडे देणार्‍या व समाजोपयोगी उपक्रम राबवणार्‍याला ती जागा भाडेतत्त्वावर देणे कायद्याला धरून आहे.

हेही वाचा :

दौंडमध्ये राष्टीयकृत बँकेत ५ कोटींचा ठेव घोटाळा

धरणसाखळीत गतवर्षाइतके पाणी ; पुणेकरांसह जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा

Back to top button