धरणसाखळीत गतवर्षाइतके पाणी ; पुणेकरांसह जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा

धरणसाखळीत गतवर्षाइतके पाणी ; पुणेकरांसह जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पावसाचा जोर कमी झाला असला, तरी खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने धरणसाठ्यात वाढ सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता या प्रकल्पात एकूण 21.18 टीएमसी (72.65 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता. धरणसाखळीत जवळपास गतवर्षाइतका पाणीसाठा सध्या जमा झाला आहे. गेल्या वर्षी 28 जुलै रोजी प्रकल्पात 21.46 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. गुरुवारी (दि. 27) सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून 3424 क्युसेस वेगाने मुठा नदीत पाणी सोडले जात होते. मात्र, शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाल्याने दुपारी एक वाजता विसर्ग बंद करण्यात आला.

वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय) धरणात 70 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे, तर पानशेतची पातळी जवळपास 80 टक्क्यांवर गेली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या तीन दिवसांत पानशेत धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या टेमघर येथे 10 मिलिमीटर, वरसगाव येथे 9, पानशेत येथे 9 व खडकवासला येथे 2 मिलिमीटर पाऊस पडला आहे

धरणांतील सध्याचा पाणीसाठा
टीएमसीमध्ये (टक्केवारी)
टेमघर
1.96 ( 52.81)
वरसगाव
9.02 (70.37)
पानशेत
8.30 (77.95)
खडकवासला
1.90 (96.17)
28 दिवसांत
15 टीएमसीची भर

गेल्या दोन आठवड्यांपासून धरणक्षेत्रात पाऊस सक्रिय आहे. त्यामुळे धरणसाखळीचीही शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. जूनअखेरीपर्यंत पावसाअभावी धरणसाखळीची पातळी चिंताजनक बनली होती. गेल्या 30 जून रोजी धरणसाखळीत केवळ 4.70 टीएमसी इतके पाणी होते. अवघ्या 28 दिवसांत 15 टीएमसीची वाढ झाली. त्यामुळे पुणेकरांसह जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news