संजय राऊत : देशपातळीवर काँग्रेसला वगळून आघाडी अशक्य | पुढारी

संजय राऊत : देशपातळीवर काँग्रेसला वगळून आघाडी अशक्य

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसची पाळेमुळे देशात रुजलेली आहेत. त्यामुळे देशपातळीवर कोणतीही आघाडी करायची झाल्यास ती काँग्रेसला वगळून होणे अशक्य आहे, असे मत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्‍त केले. 2024 च्या निवडणुकीवेळी दिल्‍लीतील चित्र संपूर्ण बदललेले असेल. एका पक्षाची सत्ता हे समीकरण राहणार नाही, असे सूतोवाचही त्यांनी पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले की, आज काँग्रेस काही राज्यांत कमकुवत असली तरी संपूर्ण देशभरात पाळेमुळे रुजलेला तो एकमेव पक्ष आहे. बाकी सर्व प्रादेशिक पक्ष आहेत. त्यामुळे काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकत नाही. भाजपचे वेगळे आहे. तो जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे. राज्यातही त्यांची ताकद मोठी आहे. मात्र, ते त्यांची ताकद सभागृहात नाही, तर बाहेर दाखवतात, असा चिमटाही राऊत यांनी काढला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केलेल्या आरोपावर राऊत म्हणाले, या महाराष्ट्रात सगळेच मराठी लोक आहेत. रेडकर ही मराठी अभिनेत्री आहे. तिचे पती एनसीबीमध्ये अधिकारी आहेत. त्यांनी काहीतरी चूक केली आहे, असे अनेकांंचे मत आहे. त्यावरून चाललेली ही लढाई आहे. ही व्यक्‍तिगत लढाई नाही.

आज केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात येऊन राज्याला बदनाम करीत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा छळ करीत आहेत. खासदार भावना गवळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी छापा टाकला, त्या मराठी नाहीत का? अनिल परब मराठी नाहीत का, असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी केला.

Back to top button