बारामतीत धावताहेत ‘ओव्हरलोड’ वाहने

बारामतीत धावताहेत ‘ओव्हरलोड’ वाहने

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  बारामती शहर आणि तालुक्यात हजारो वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या मालाची वाहतूक होत आहे. याकडे मात्र येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, अपघाताचा धोका वाढला आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. बारामती कार्यालयांतर्गत येणार्‍या दौड, इंदापूर आणि बारामती या तिन्ही तालुक्यांत हीच परिस्थिती आहे. राज्य आणि राष्ट्रीय मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणार्‍या वाहनांची संख्या जास्त आहे.

हजारो वाहनांची कागदपत्रे अपुरी आहेत, तरीही अशी वाहने बिनधास्त रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. वाहनचालक अशा पद्धतीने धोकादायक प्रवास करीत अपघातांना निमंत्रण देत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई झाल्यास शासनाच्या महसुलात वाढ होईल. याशिवाय अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, आरटीओ कार्यालयाकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत आहे. यामुळे वाहनचालक व मालक याचा फायदा घेत आहेत.

फॅन्सी नंबरप्लेटची क्रेझ
बारामती शहर, औद्योगिक परिसर तसेच संपूर्ण ग्रामीण भागात दुचाकी व चारचाकी वाहनांना फॅन्सी नंबरप्लेट बसविण्याची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. यामुळे वाहनाचा क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने संबंधित वाहन चोरीचे आहे का? याचीही तपासणी करीत फॅन्सी नंबरप्लेट लावणार्‍या वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी बारामतीकर करीत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news