संतापजनक ! मुलाला खायला लावली कबूतर विष्ठा

file photo
file photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने एका 12 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून ढाबळीतील कबूतर घेतल्याच्या वादातून त्याला कात्रजमधील संतोषीमाता मंदिराच्या मागील बाजूला नेऊन कबुतराची विष्टा खायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कात्रजमधील संतोषनगर येथील एका अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सराईत गुन्हेगार अमोल आडम याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. त्यातील दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कबुतरे पाळली होती. त्यातील एक कबूतर फिर्यादीच्या 12 वर्षांच्या मुलाने आणले होते. त्यावरून अमोल आडम हा त्याच्या तीन साथीदारांसह संतोषनगरमध्ये आला. त्यांनी हवेत हत्यारे फिरवून दहशत निर्माण केली. फिर्यादी यांच्या 12 वर्षांच्या मुलाला हाताने मारहाण केली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्याला दुचाकीवर बसवून कात्रज येथील साई अपार्टमेंट येथे नेले. तेथे त्याला कबुतराची विष्ठा खायला लावली. त्यानंतर पोलिसांना आमचे घर दाखविले तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन त्याला साई मंदिराजवळ सोडून दिले. त्यानंतर त्याने हा प्रकार वडिलांना सांगितला. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून, दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलिस निरीक्षक वर्षा तावडे तपास करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news