दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या आणखी एकाला अटक | पुढारी

दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या आणखी एकाला अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांनी पुणे, सातारा तसेच कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोट चाचण्या केल्याच्या प्रकाराला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दुजोरा दिला आहे. त्याबरोबरच पुण्यात दहशतवाद्यांना आसरा देणार्‍या आणखी एकाला एटीएसने अटक केली आहे. त्याला विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयाने 5 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोथरूड पोलिसांच्या पथकाने मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23), मोहम्मद युसूफ मोहम्मद याकूब साकी (वय 24, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा. मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना दुचाकी चोरीच्या संशयातून दहा दिवसांपूर्वी पकडण्यात आले होते.

यांची घराची झडती घेतल्यानंतर त्यांचे दहशतवादी कनेक्शन पुढे आले होते. दरम्यान, याप्रकरणात यूएपीएच्या कायद्याचे कलम 19 वाढविण्यात आले आहे. त्यांचा साथीदार व म्होरक्या महंमद शहनवाज आलम (वय 31) पसार झाला आहे. त्याचा शोध एटीएस, एनआय व पुणे पोलिसांकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे. याप्रकरणात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) कलम 10, 13, 16 ब, 18 आणि 20 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अब्दुलला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता यामध्ये कलम यूएपीएच्या कलम 19 नुसार वाढ करण्यात आल्याचे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयात सांगितले. नुकताच गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांकडून एटीएसकडे वर्ग करण्यात आला आहे.

मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी हे जयपूरमधील यूएपीएच्या गुन्ह्यात फरार आरोपी आहे. यांच्यावर एनआयने गुन्हा दाखल केल्यानंतर हे दोघे मार्च 2022 मध्ये मुंबईतील भेंडी बाजार येथे पळून आले होते. मुंबईत पकडल्या जाऊ या भीतीने हे दोन्ही दहशतवादी पुण्यात आले होते. ते पुण्यातील कौसर भाग राहत होते. तेव्हा त्यांची ओळख अब्दुल कादीर दस्तगीर पठाण यांच्याशी झाली. त्या वेळी या दोन्ही दहशतवाद्यांनी अब्दुल आम्ही गरीब असून, कामाच्या शोधात आलो असल्याचे सांगितले.

अब्दुल कादीर दस्तगीर पठाण हा कोंढवा भागात राहत असून, त्याच्या ग्राफिक्स डिझाईनचा व्यवसाय आहे. अब्दुल पठानने मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी यांना ग्राफिक्स डिझाईनचे काम देतो, असे सांगितले आणि त्यांना महिन्याला आठ हजार रुपये पगार दिला. तसेच अब्दुल पठाण याने चेतना गार्डनमधील अन्वर अली इद्रिस यांच्या मालकीची एक खोली भाड्याने घेतली आणि ही खोली दहशतवाद्यांना राहायला दिली. या खोलीचे भाडे अब्दुल त्या दहशतवाद्यांकडून घेत होता.

दरम्यान, सहायक पोलिस आयुक्त अरुण वायकर यांनी न्यायालयात सांगितले की, मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी या दोघांची पार्श्वभूमी अब्दुल पठाण याला माहीत होती. त्याने मागचे दीड वर्ष या दोघांना आसरा दिला. स्वतः 10 बाय 12च्या खोलीत राहून तो यांना कसा काय पैसे देत होता? त्यांना कुठल्या संघटना, संस्था मदत करत होत्या? तसेच टेरर फंडिंगसाठी कोण मदत करत होते ? याचा तपास करायचा असल्याने विशेष सरकारी वकील विजय फरगडे तसेच तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त अरुण वायकर यांनी त्याच्या पोलिस कोठडची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

 जंगलात वापरलेले टेन्ट सापडले
दोन्ही दहशतवाद्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. त्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्याला एटीएसने दुजोरा देतानाच जंगलात त्यांनी वापरलेले टेन्टही त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

स्फोटकाच्या आढळल्या होत्या पांढर्‍या गोळ्या

पुणे पोलिसांना त्यांच्याकडून एक पेन ड्राईव्ह, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वस्तू तसेच पांढर्‍या पावडरच्या गोळ्या आढळून आल्या होत्या. हा तपास सुरू असतानाच त्यांच्याकडे दुसर्‍या खोलीत आणखी एक लॅपटॉप सापडला. त्यातील एका पेन ड्राईव्हद्वारे एटीएसच्या हाती लागलेल्या माहितीचा अहवाल एटीएसने न्यायालयात सादर केला होता. एटीएसच्या तपासात सापडलेली ती पांढर्‍या गोळ्यांची पावडर ही स्फोटक असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे, तर पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) यासंबंधी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : 

पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर पुन्हा दरड कोसळली | Pune-Mumbai expressway

Back to top button