पिंपरी : कचरा डेपो रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे | पुढारी

पिंपरी : कचरा डेपो रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : प्रस्तावित कचरा डेपो रद्द करण्यासाठी पुनावळेकरांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घातले आहे. याबाबत शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांनी निवेदन देत ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

या प्रसंगी आमदार अश्विनी जगताप उपस्थित होत्या. पुनावळे येथे वन विभागाने महापालिकेला हस्तांतरित केलेली 26 हेक्टर जमीन आहे. सन 2008 मध्ये ही जमिन कचरा डेपोसाठी आरक्षित केली आहे. मात्र, कचरा डेपोला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. मागील पंधरा वर्षात या भागात विविध शैक्षणिक संस्था, मोठे गृहप्रकल्प आले आहेत. जवळच हिंजवडी आयटी पार्क असल्याने देशभरातून आलेले नागरिक पुनावळे परिसरात स्थायिक झाले आहेत. सध्या पुनावळे या उपनगराची लोकसंख्या जवळपास एक लाखाच्या घरात पोहचली आहे.

त्यामुळे येथे कचरा डेपो झाल्यास येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होईल, अशी भीती स्थानिकांना आहे.
पुनावळे जवळील रावेत बंधार्‍यातून संपूर्ण पिंपरी- चिंचवड शहरास पाणीपुरवठा केला जातो. कचरा डेपो झाल्यास शहरातील सर्व नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. या सर्व बाबी विचारात घेवून पुनावळे येथे प्रस्तावित असलेला कचरा डेपो रद्द करावा, अशी मागणी चेतन भुजबळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पर्यावरणाची हानी

पुनावळे येथील वनविभागाच्या 26 हेक्टर जमिनीवर अनेक प्रकारची दाट वृक्षे आहेत. पुनावळे येथे डेपो निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करावी लागणार आहे.

हेही वाचा

मुळा-मुठा व भीमा नदीच्या पाण्यात दिसतोय फरक ; वाळकी संगमबेट येथे दिसतेय नयनरम्य दृश्य

शेताला रस्ता नाही; हेलिकॉप्टरसाठी अनुदान द्या ! महिलेची मागणी

कोल्हापूर : बालिंगे पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू

Back to top button