बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कमळ हाती घेणाराच | पुढारी

बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कमळ हाती घेणाराच

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा व कमळ हाती घेणाराच उमेदवार असेल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी पत्रकारांशी बोलताना येथे दिली. बारामतीत भाजपतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी ते आले असताना पत्रकारांशी बोलत होते. या वेळी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, भाजपचे शहराध्यक्ष सतीश फाळके, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेश कांबळे, बाजार समितीचे माजी संचालक पोपटराव खैरे, वैभव सोलनकर आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

काळे म्हणाले, भाजप-सेना महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सहभागी झाला आहे. या राजकीय घडामोडीमुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ—मावस्था होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठका घेऊन भाजपची भूमिका समजावून सांगत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संभ—म दूर केला आहे. भाजपचे लक्ष्य आगामी लोकसभा निवडणुका आहे. त्यामुळे हे अभियान आम्ही सुरू केले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 60 हजार घरांमध्ये आम्ही भाजपची ध्येय धोरणे पोहोचविणार आहोत.

बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढवणार आहे. या मतदारसंघात उमेदवार हा भाजप विचारसरणीचा असणार आहे. निवडणुकीअगोदर उमेदवाराचे नाव भाजप निश्चित करत नाही. मात्र, बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मोदींच्याच विचारांचा उमेदवार असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्रित लढवली जाणार आहे. या निवडणुकीतही भाजप व मित्र पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button