झाडाझडतीत 602 जणांना अटक ; पुणे शहर पोलिसांची विशेष मोहीम | पुढारी

झाडाझडतीत 602 जणांना अटक ; पुणे शहर पोलिसांची विशेष मोहीम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील गुंडगिरीचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबविली. मध्यरात्री पोलिसांनी शहरातील सहा हजार 116 सराइतांची झाडाझडती घेतली. पोलिसांनी 602 सराइतांना अटक केली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराइतांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, पंधरा दिवसांत तिसर्‍यांदा गुंडाची झाडाझडती घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. विविध पोलीस ठाण्यांतील पथके, तसेच गुन्हे शाखेतील पथके विशेष मोहिमेत सहभागी झाले होते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर कारवाई करण्यात आली. शोधमोहीम राबवून गुन्हेगारांच्या वास्तव्याची ठिकाणी शोधून काढण्यात आली. या कारवाईत 602 जणांना अटक करण्यात आली.

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली. मुंबई प्रतिबंधात्मक कायद्यानुसार 46 जणांना, तसेच जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये 28 जणांना अटक करण्यात आली. शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्यात आली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंग गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, विजयकुमार मगर, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे आदींच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

नाकाबंदीत 934 वाहनांची तपासणी
शहरातील बसस्थानके, रेल्वेस्थानक, हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी करून संशयित वाहनचालकांची चौकशी करण्यात आली. नाकाबंदीत 934 वाहनचालकांची तपासणी करण्यात आली असून, 213 वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख 46 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button