नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून केलेले ट्विट चर्चेत आले आहे. "आज तुम्ही राजस्थानला येत आहात. तुमच्या PMO कार्यालयाने कार्यक्रमातून माझे पूर्व नियोजित ३ मिनिटांचे भाषण काढून टाकले आहे. त्यामुळे मी तुमचे स्वागत भाषणाच्या माध्यमातून करू शकणार नाही. म्हणून मी या ट्विटद्वारे राजस्थानमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे." असे ट्विट गेहलोत यांनी केले होते. त्या ट्विटला आता पीएमओंनी उत्तर दिले आहे. (PM Modi Rajasthan tour)
"…प्रोटोकॉलनुसार, तुम्हाला आमंत्रित करण्यात आले होते आणि तुमचे भाषणही ठेवण्यात आले होते. पण तुमच्या कार्यालयाने सांगितले की तुम्ही कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. पंतप्रधानांच्या मागील दौऱ्यांमध्येही तुम्हाला आमंत्रित केले होते आणि तुम्ही त्या कार्यक्रमांना उपस्थित राहिला. आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. विकासकामांच्या फलकावर तुमचे नाव आहे. तुम्हाला काही अडचण नसल्यास तुमची उपस्थिती खूप मोलाची असेल." असे PMO नी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (PM Modi Rajasthan tour)
आज होत असलेल्या १२ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आणि पायाभरणी हे राजस्थान सरकार आणि केंद्र यांच्यातील सहकार्यातून होत आहे. या वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रकल्प खर्च ३,६८९ कोटी रुपये असून, त्यात २,२१३ कोटी रुपये केंद्राचा आणि १,४७६ कोटी रुपये राज्य सरकारचा हिस्सा आहे. राज्य सरकारच्या वतीनेही मी सर्वांचे अभिनंदन करतो, असे गेहलोत यांनी ट्विट करत म्हटले होते.
दरम्यान, गेहलोत यांनी ट्विटच्या माध्यमातून ५ मागण्या केल्या आहेत. या मागण्या ६ महिन्यांत होणाऱ्या या ७ व्या दौऱ्यात तुम्ही पूर्ण कराल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा :