

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. स. प. महाविद्यालय मैदानावर होणारा हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून, इतरांना हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहेत. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणारा शासकीय कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.
लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण केले जाते. यंदाचा पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांना दिला जाणार आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुरस्कार वितरण कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून, लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे मान्यवरांना निमंत्रित केले जाणार आहे. हा कार्यक्रम सामान्य पुणेकरांना पाहता यावा, यासाठी ट्रस्टतर्फे थेट प्रक्षेपणाची लिंक दिली जाणार आहे. याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि मेट्रो यांच्या विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सामान्य पुणेकरांसाठी खुला असणार आहे. यासाठी जवळपास दहा हजार जणांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून प्रोटोकॉलनुसार लोकप्रतिनिधी व मान्यवरांना निमंत्रण दिले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये शहरात दोन कार्यक्रम होणार आहेत. टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी कोणाला निमंत्रण द्यायचे, हे ट्रस्ट ठरविणार आहे. मात्र, शिवाजीनगर येथील पोलिस मैदानावर होणारा कार्यक्रम पुणेकरांच्या विकासकामांचा आहे. त्यामुळे या शासकीय कार्यक्रमासाठी भाजपकडून कोणतेही शक्तिप्रदर्शन केले जाणार नाही. मात्र, पुणेकरांच्या विकास प्रकल्पासाठी पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमास हजेरी लावावी.
-मुरलीधर मोहोळ, माजी महापौर व प्रदेश सरचिटणीस, भाजप.
नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार विकासकामांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पंतप्रधान कार्यालयाकडून हा दौरा प्राप्त झाला आहे. त्यानुसार सुमारे साडेपाच तासांचा हा दौरा असणार आहे. सर्वप्रथम ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अभिषेक करणार आहेत. त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन त्यांच्या हस्ते केले जाणार आहे.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवारी (1 ऑगस्ट) सकाळी दिल्ली येथून लोहगाव विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे आगमन होईल. लोहगाव विमानतळावरून शिवाजीनगर भागात तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर वाहनाने दगडूशेठ गणपती मंदिरात त्यांच्या हस्ते अभिषेक पूजा होणार आहे. त्यानंतर स. प. महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधान मोदी यांना गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी शिवाजीनगर येथील कार्यक्रमात विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा :