पुण्यातील समस्यांकडे आमदारांनी विधिमंडळात वेधले लक्ष | पुढारी

पुण्यातील समस्यांकडे आमदारांनी विधिमंडळात वेधले लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोयता गँगची दहशत, सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, यासह पाणी आणि कचरा अशा नागरी प्रश्नांकडे पुण्यातील आमदारांनी विधिमंडळाचे लक्ष वेधले. चांदणी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारावा, अशी मागणीही करण्यात आली. शहरात गेल्या काही दिवसांपासून ‘कोयता गँग’ ही नवीन गुन्हेगारी प्रवृत्ती उदयास आली आहे. सदाशिव पेठेत युवतीवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत शहरातील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंदे, याकडे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. शहरातील अवैध धंद्यांतून गुन्हेगारांना रसद पुरवली जात असून, पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची बाब त्यांनी मांडली. पब संस्कृतीकडे तरुणाई वाहवत चालल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.

शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे. सायबर विभागात चालू वर्षात सव्वाशेहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील फक्त 25 तक्रारी दाखल झाल्या आहेत. शासनाने तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, असा औचित्याचा मुद्दा आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. मांसाहारी पदार्थांच्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारण्याच्या सूचना राज्य सरकारने महापालिकांना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

महापालिकेकडून समाविष्ट गावांत सुरू असलेले ड्रेनेजलाईन, पावसाळी लाइन टाकण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे, असा आरोप आमदार भीमराव तापकीर यांनी विधिमंडळात केला. याप्रकरणी त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.

हेही वाचा : 

गोंदियातून एका संशयिताला ताब्यात ; एटीएस प्रमुख पुण्यात तळ ठोकून

पुणे : सर्व्हन्ट्स सोसायटी अध्यक्षांची विदेशवारी, सचिव देशमुखांची मनमानी

Back to top button