धरणे भरू लागली... पुणे शहरातील पाणीकपात थांबवा ! | पुढारी

धरणे भरू लागली... पुणे शहरातील पाणीकपात थांबवा !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  खडकवासला धरणसाखळीत पुणे शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाल्याने शहरात सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्याची मागणी शिवसेना (ठाकरे गट), मनसे, रिपाइं (आठवले गट) या राजकीय पक्षांसह सजग नागरिक मंचने केली आहे. खडकवासला धरणसाखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांतील एकूण पाणीसाठा मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत 18.59 टीएमसी झाला आहे. तर खडकवासला धरण 91 टक्के भरले आहे. खडकवासला भरल्यानंतर 1.81 टीएमसी क्षमतेचे मुठा नदीत पाणी सोडले जाते.

हे धरण पूर्णक्षमतेने भरले नसून, पाणलोटक्षेत्रात होणारा पाऊस आणि पाण्याचा जोर गृहीत धरून मंगळवारी सायंकाळी सात वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीत 428 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पानशेत धरण हे 67.88 टक्के, वरसगाव धरण 61.40 टक्के आणि टेमघर धरण 45.23 टक्के भरले आहे. यामुळे पुणे शहरातील पाणीकपात रद्द करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक विशाल धनवडे, संजय भोसले, बाळा ओसवाल, अशोक हरणावळ, अविनाश साळवे, रिपाइंचे (आठवले गट) माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे आणि सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदने देऊन पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागसकर, वनिता वागसकर, हेमंत संभूस आदींच्या शिष्टमंडळाने पाणीकपात रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

हेही वाचा :

सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट; सतर्कतेचा इशारा

राज्य मंडळाकडून 13 कोटी प्रमाणपत्रांचे जतन; प्रमाणपत्रे डिजीलॉकरमध्ये सुरक्षित

Back to top button